पुणे : ‘थिएटर ॲकॅडमी’च्या अध्यक्षपदी प्रसाद पुरंदरे यांची आगामी तीन वर्षांसाठी फेरनिवड करण्यात आली. जागतिक रंगभूमी दिन आणि संस्थेचा सुवर्णमहोत्सव पूर्ती वर्धापनदिन असे दुहेरी औचित्य साधून महाराष्ट्रीय मंडळ आणि थिएटर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने उभारलेल्या सकल ललित कलाघर येथे झालेल्या ‘थिएटर ॲकॅडमी‘च्या वार्षिक सर्वसधारण सभेमध्ये संस्थेच्या नवीन कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली.
हेही वाचा >>> पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर टोलमध्ये वाढ; एप्रिल महिन्यापासून होणार अंमलबजावणी; वाहनचालकांना फटका
गेल्या ५० वर्षांमध्ये संस्थेने ‘घाशीराम कोतवाल’, ‘तीन पैशाचा तमाशा’, ‘महानिर्वाण’, ‘पडघम’ पासून ते याच वर्षी निर्मित झालेल्या ‘स्थलांतरित’पर्यंत अनेकविध दर्जेदार नाटकांची निर्मिती केली आहे. त्याचबरोबर अनेक नाट्य कलाविषयक उपक्रम संस्थेने राबविले आहेत. भविष्यकाळात सकल ललित कलाघर या कला संकुलाच्या माध्यमातून कला शिक्षण आणि प्रयोग यांची योजना करण्याचा संस्थेचा मानस आहे, असे प्रसाद पुरंदरे यांनी सांगितले. वार्षिक सर्वसाधारण सभेस ज्येष्ठ दिग्दर्शक डाॅ. जब्बार पटेल, रंगकर्मी माधुरी पुरंदरे आणि उदय लागू उपस्थित होते. संस्थेच्या कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष राया भावे, सचिव मानस शिंदे, सहसचिव कल्याण किंकर आणि सुकृत खुडे, खजिनदार निखिल श्रावगे या पदाधिकाऱ्यांसह अजित भगत, श्रीराम पेंडसे, संजय लोणकर, अनिकेत बापट आणि अमेय सुपनेकर या सदस्यांचा समावेश आहे.