प्रसिद्ध वक्ते नामदेव जाधव यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल वक्तव्य करणं भोवलं आहे. नामदेव जाधवांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं आहे. पुण्यात नामदेव जाधव माध्यमांशी संवाद साधत होते. तेव्हा अचानक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जाधवांना काळं फासलं.
नामदेव जाधवांनी सोशल मीडियावर एक प्रमाणपत्र शेअर केलं आहे. त्यात शरद पवार हे ‘ओबीसी’ असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच, मराठा आरक्षणावरून जाधवांनी शरद पवारांवर आरोपही केले होते. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते.
त्यातच आज ( १८ नोव्हेंबर ) पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन महाविद्यालय येथे होणाऱ्या नामदेव जाधवांच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. तसेच, त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशाराही दिला होता. यानंतर भांडारकर संस्थेने कुठलाही अनुचित प्रकार घडून नये, म्हणून नामदेव जाधवांचा कार्यक्रम रद्द केला. अशात नवी पेठ येथे पत्रकार भवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जाधवांना काळं फासलं.
“जाधवांना खंडणीच्या गुन्ह्यात विक्रोळी पोलिसांनी अटक केली होती”
याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी स्वीकारली आहे. ‘टीव्ही ९ मराठी’शी संवाध साधताना प्रशांत जगताप म्हणाले, “या आंदोलनाची जबाबदारी आम्ही स्वीकारतो. नामदेव जाधवांना खंडणीच्या गुन्ह्यात विक्रोळी पोलिसांनी अटक केली होती. तसेच, पैसे घेऊन मुलांचे गुण वाढल्याप्रकरणी शाळेतून जाधवांची हकालपट्टीही झाली होती. आता जाधव शरद पवारांवर टीका करत आहेत.”
“…म्हणून जाधवांना कार्यकर्त्यांनी काळ फासले”
“लोकशाहीत टीका करण्याचा अधिकार नक्की आहे. पण, खऱ्या पुराव्यांच्या आधारावर टीका करावी. शरद पवारांवर नाहक खोटे आरोप करण्यात येत होते. नामदेव जाधवांना टीका करू नका, इसा इशाराही दिला होता. पण, ते थांबले नाहीत. म्हणून जाधवांना कार्यकर्त्यांनी काळ फासले,” असं स्पष्टीकरण प्रशांत जाधवांनी दिलं आहे.