पिंपरी- चिंचवड: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरडकरचा आलिशान रोल्स रायल्स सोबत एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ही आलिशान गाडी पिंपरी -चिंचवडमधील बांधकाम व्यवसायिक तुषार कलाटे यांची असल्याच समोर आलं आहे. तीन ते चार महिन्यांपूर्वी मित्रासह प्रशांत कोरडकरची भेट झाली होती. रोल्स रॉयल गाडी पाहून त्यांनी त्याची राईड मारली. माझा आणि प्रशांत कोरडकरचा काहीही संबंध नाही. असं स्पष्टीकरण बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटे यांनी दिलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा प्रशांत कोरडकर पुन्हा एकदा प्रकाश झोतात आला आहे. अलिशान गाडीसोबत व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर ती गाडी नेमकी कोणाची असा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत चर्चा रंगली होती. अखेर ही आलिशान गाडी पिंपरी- चिंचवड शहरातील बांधकाम व्यवसायिक तुषार कलाटे यांची असल्याच समोर आलं आहे. मुळशी येथील कलाटे फॉर्म हाऊसवर गेल्या काही दिवसांपासून पार्क केलेली होती. याबाबत तुषार कलाटे यांनी खुलासा केला आहे. ते म्हणाले, तो व्हिडिओ तीन- चार महिन्यापूर्वीचा आहे. रोल्स रॉयल ही गाडी माझ्या मालकीची आहे.

पुढे ते म्हणाले, बीएमडब्ल्यू फायनान्स कडून २०१७ ला घेतलेली आहे. त्यानंतर २०१८ ला सीआयडी चौकशी देखील झाली होती. सीआयडीच्या चौकशीला मी सहकार्य केलं आणि कागदपत्र दिले. पुढे ते म्हणाले, काहीही बेकायदेशीर नाही. सर्व कायदेशीर आहे. प्रशांत कोरडकर आणि माझा लांब लांबपर्यंत संबंध नाही. माझ्या मित्रासोबत कोरडकर मला भेटला. माझी गाडी पाहून त्याने मला राईड मागितली. हे सर्व तीन-चार महिन्यापूर्वीचं आहे. माझी बदनामी करण्याचा प्रयत्न आहे. माझी चौकशी झाली तर मी त्याला सामोरे जाईल. पुढे ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं त्याचा निषेध करतो.