विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे सध्या देशात चर्चेत असलेल्या पुण्यातील ‘फिल्म अॅंड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’च्या संचालकपदी शुक्रवारी प्रशांत पाठराबे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्याकडे संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. संस्थेचे सध्याचे संचालक डी. जे. नरेन यांचा कार्यकाळ शुक्रवारीच संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर पाठराबे यांच्याकडे संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. पाठराबे सध्या ‘नॅशनल फिल्म अर्काइव्ह ऑफ इंडिया’चे संचालक आहेत.
संस्थेच्या संचालकपदावर कोणाची नियुक्ती करावी, याचा निर्णय घेण्यासाठी गेल्या सोमवारी बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, ही बैठक माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने एक दिवस अगोदर रद्द केली. एफटीआयआयच्या संचालकपदी नरेन यांची २०११ मध्ये तीन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली होती. गेल्यावर्षी त्यांना एक वर्षाची मुदतवाढही देण्यात आली होती. यंदाही त्यांनाच मुदतवाढ देण्यात येईल, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. मात्र, त्यांना मुदतवाढ न देता प्रशांत पाठराबे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.

Story img Loader