हिंदूवी स्वराज्यासाठी प्राणपणाने लढणारे, महाराष्ट्राबाहेरच्या प्रांतामध्ये मराठी भाषा आणि संस्कृतीची पताका डौलाने फडकावीत ठेवणारे तंजावर येथील राजघराणे आधुनिकतेची कास धरीत आता माहितीच्या मायाजालात येत आहे. तंजावर राजघराण्याचे संकेतस्थळ विकसित करण्यात आले असून २ जून रोजी या संकेतस्थळाचे औपचारिक उद्घाटन होणार आहे. संकेतस्थळामुळे जगभरातील लोकांसाठी तंजावर राजघराण्याची माहिती संगणकाची एक कळ दाबताच खुली होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे बंधू व्यंकोजीराजे यांनी तंजावर येथे हिंदूवी स्वराज्याचे केवळ प्रतिनिधित्वच केले नाही तर, या हिंदूवी स्वराज्याचा विस्तार करण्यासाठी प्राणांची बाजी लावली. त्यामुळेच दक्षिणेकडील प्रांत असला तरी तंजावर येथे मराठी भाषा आणि संस्कृतीची मोठय़ा दिमाखात जोपासना होत आहे. एकेकाळी ढाल-तलवारीच्या साहाय्याने युद्धकलेमध्ये प्रावीण्य मिळविलेल्या तंजावर राजघराण्याने आता काळाची पावले ओळखून हाती संगणकाचा माऊस घेतला आहे. महाराज व्यंकोजीराजे यांचे १४ व्या पिढीतील वंशज आणि महाराज सरफोजीराजे यांचे सहाव्या पिढीतील वंशज युवराज प्रतापसिंहराजे भोसले यांनी हे संकेतस्थळ विकसित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
हे संकेतस्थळ सरफोजी मेमोरियल हॉल या नावानेच विकसित करण्यात आले आहे. सदर महाल राजवाडा येथे १९९७ मध्ये हे संग्रहालय साकारण्यात आले आहे. माझे आजोबा तुळाजेंद्रराजे भोसले यांनी या संग्रहालयासाठी राजवाडय़ातील ही जागा दिली होती, असे प्रतापसिंहराजे भोसले यांनी सांगितले. या संकेतस्थळामध्ये संग्रहालयाची तपशीलवार माहिती, तंजावरचे मराठी राजे आणि तंजावर राजघराण्यातील दुर्मिळ छायाचित्रे पाहता येतील. प्रतापसिंहराजे यांनी २०१३ मध्ये ‘मराठा किंग्ज ऑफ तंजावर’ हे फेसबुक पेज सुरू केले आहे. त्याला केवळ भारतातूनच नव्हे तर, जगभरातून उत्तम प्रतिसाद लाभला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी लिहिलेल्या ‘कॉन्ट्रिब्यूशन्स ऑफ तंजावर मराठी किंग्ज’ या पुस्तकाचे गेल्या वर्षी प्रकाशन झाले होते. पाश्चात्य वास्तुकलेचा अप्रतिम नमुना असलेल्या सदर महाल येथे सरफोजीराजे भोसले यांचे वास्तव्य होते आणि या महालामध्येच त्यांचा खासगी दरबार भरत असे. सदर महालामध्येच साकारलेल्या सरफोजी मेमोरियल हॉल येथे महाराज सरफोजी यांच्या संग्रहातील तंजावर कलाकुसरीची चित्रे (तंजावर पेंटिंग्ज), हस्तिदंती, चांदी, स्फटिकाच्या दुर्मिळ वस्तू, शस्त्रास्त्रे, संगमरवरी कलाकुसर असलेल्या वस्तू पाहावयास मिळतात. कृष्ण विलास तलावाजवळ उद्यान विकसित करण्यात आले आहे, अशी माहिती प्रतापसिंहराजे भोसले यांनी दिली.