भारतीय जेवणातील पदार्थाची कल्पना मसाल्यांशिवाय करताच येत नाही. पदार्थाची रंगत वाढवणाऱ्या या मसाल्यांमध्ये ‘प्रवीण मसालेवाले’ किंवा ‘सुहाना मसाले’ ही नावे ऐकली असतीलच. चोरडिया कुटुंबीयांनी सुरू केलेल्या या उद्योगाने पुण्यातून सुरुवात केली आणि ते जगात पोहोचले. जागतिक स्तरावर होणाऱ्या खाद्यपदार्थाच्या चवींविषयीच्या विविध स्पर्धामध्ये वेळोवेळी आपल्या चवीचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या या उद्योगाचा सुरुवातीचा प्रवास खडतर होता.
मसाले तयार करणारे उद्योग कमी नाहीत. मोठमोठय़ा व्यावसायिकांपासून बचत गटांपर्यंतच्या व्यावसायिकांनी बनवलेले अनेक प्रकारचे लोणची आणि मसाले बाजारात उपलब्ध आहेत. परंतु सर्वच मसाला उद्योग स्पर्धेत टिकाव धरू शकत नाही. राज्याबाहेर देशाच्या कानाकोपऱ्यात आणि अगदी देशाबाहेरही सर्वजण पोहोचू शकत नाहीत. ‘प्रवीण मसालेवाले’ किंवा ‘सुहाना मसाले’ ही नावे ऐकली नाहीत अशा व्यक्ती महाराष्ट्रात तरी विरळाच असतील. अत्यंत अचडणींमधून मार्ग काढत कष्टाने उभा राहिलेला आणि फक्त देशभरातच नव्हे, तर पंचवीस देशांत उत्पादने पाठवणारा हा उद्योग पुण्यात रुजला हे मात्र अनेकांना माहीत नसते. ‘प्रवीण मसाले, ‘सुहाना मसाले’ आणि ‘अंबारी’ या सर्व उत्पादनांचे निर्माते एकच. चोरडिया कुटुंबीय. या व्यवसायाविषयी जाणून घेताना त्याचे जनक हुकमीचंद चोरडिया आणि त्यांच्या पत्नी कमलाबाई चोरडिया यांचा प्रवास जाणून घ्यायला हवा.
हुकमीचंद चोरडिया हे मूळचे नगर जिल्ह्य़ातल्या पारनेरचे. पुण्यात वडगाव-धायरी भागात चोरडियांचे किराणा मालाचे दुकान होते. हुकमीचंद आणि कमलाबाईंनी अनेक आर्थिक चढउतारांचा सामना करत धीराने केलेली वाटचाल कोणत्याही व्यावसायिकाला प्रेरणा देईल अशीच! प्रवीण मसालेवाल्यांचा व्यवसाय खरा १९६२ मध्ये सुरू झाला. परंतु त्यापूर्वी या व्यवसायाचे बीज सोलापुरात रोवले गेले होते. आर्थिक अडचणींमधून मार्ग काढू पाहणाऱ्या हुकमीचंद यांना कमलाबाईंनी मसाल्याचा व्यवसाय सुरू करण्याबद्दल सुचवले आणि ‘आनंद मसाला’ या नावाने त्यांनी पहिले पाऊल टाकले. कमलाबाई स्वत: रोज २०-२५ किलोंचा हा मसाला कुटून देत आणि हुकमीचंद सायकलवरून फिरून सोलापुरात त्याची विक्री करत. त्यांचा कांदा-मिरची मसाला लोकप्रिय होऊ लागला आणि मागणीही वाढू लागली. परंतु पुढे ते पुण्यात परत आले आणि पुन्हा चढउतारांना सुरुवात झाली. असा काही काळ गेल्यानंतर या दांपत्याने पुन्हा मसाल्याचाच व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. कमलाबाई पुन्हा मसाला बनवण्यासाठी पदर खोचून तयार झाल्या. आता ते कांदा-लसूण मसाला आणि गरम मसालाही तयार करू लागले. आपल्या दुसऱ्या अपत्याचे नाव त्यांनी व्यवसायास दिले आणि ‘प्रवीण मसालेवाल्यां’ची वाटचाल सुरू झाली. ‘हत्ती’ हे त्यांच्या मसाल्यांचे चिन्ह होते. त्यामुळे ‘हत्तीछाप’ मसाले म्हणूनही हे मसाले चांगले ओळखले जाऊ लागले. १९७० पर्यंत हा व्यवसाय जोम धरू लागला होता. चोरडियांचा मोठा मुलगा राजकुमारदेखील शिक्षण घेता-घेता व्यवसायात लक्ष घालू लागला होता.
या वेळेपर्यंत त्यांनी लोणची बाजारात आणली नव्हती. मसाल्यांचेही खूप प्रकार नव्हते. तयार लोणच्यांना ग्राहक मिळू शकतील असे त्यांना वाटले आणि १९७७-७८ मध्ये त्यांनी लोणची बनवणे सुरू केले. १९८०-८२ नंतर मसाल्यांचे अधिक प्रकार बाजारात आणले. चोरडियांच्या लोणच्यांची विशेष ‘रेसिपी’ लोकप्रिय होऊ लागली. आपल्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांना चोरडिया आवर्जून मसाला-लोणच्यांच्या चवीबद्दल अभिप्राय विचारत आणि त्यानुसार आवश्यक वाटल्यास चवीत बदलही करत. बाजारात त्या-त्या वेळी जे उपलब्ध होते, त्याच्याशी स्पर्धा न करता आपण वेगळे काय देऊ शकतो, हे त्यांना महत्त्वाचे वाटे. तसेच पदार्थाच्या चवीबरोबरच त्याचे आकर्षक वेष्टनीकरणही महत्त्वाचे होते. चव टिकवण्यासाठी कच्चा माल उत्तम दर्जाचाच वापरायचा हे तत्त्व ‘प्रवीण’ने नेहमी पाळल्याचे राजकुमार चोरडिया नमूद करतात.
‘इन्स्टंट’ आणि ‘रेडी टू कुक’ मसाल्यांमध्ये ‘सुहाना’चे मोठे नाव आहे. ‘प्रवीण’ या ब्रँडखाली लोणची, ‘सुहाना’ या नावाखाली वेगवेगळे मसाले आणि ‘रेडी टू कुक’ उत्पादने आणि ‘अंबारी’ या नावाने
जुन्या पद्धतीचे गोडा मसाला, कांदा-लसूण मसाल्यासारखे मसाले अशी विभागणी त्यांनी केली आहे. १९८७-८८ मध्ये त्यांचे ‘इन्स्टंट’ मसाले आले आणि नंतर ‘रेडी टू कुक’ बाजारात आली. प्रादेशिक मसाल्यांमधील काही खास चवीही त्यांनी आणल्या. ‘प्रवीण’चे मसाले १९८५ पासून पुण्याबाहेर जाऊ लागले. सुरुवातीला चोरडिया कुटुंबीय स्वत:च बाहेर विक्रीसाठी जात असत. परंतु १९९५ नंतर किरकोळ दुकानांमध्ये विक्री होऊ लागली. महाराष्ट्रात सगळीकडे आणि देशात ९ राज्यांत हे मसाले मिळतात. इतकेच नव्हे तर २५ देशांतही ते उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
चोरडियांच्या उत्पादनांची आताची ओळख ‘हत्ती छाप’ अशी राहिलेली नाही. परंतु त्यांची तेव्हाची चव कायम आहे. हुकमीचंद आणि राजकुमार चोरडियांच्या मार्गदर्शनाखाली पुढची पिढी विशाल आणि आनंद चोरडिया हे आता विपणन व उत्पादन विकासाचे काम पाहतात. जागतिक व देशपातळीवर होणाऱ्या मसाल्यांच्या चवींसाठीच्या विविध स्पर्धामध्ये चोरडिया सहभागी होतात. इतरांच्या तुलनेत आपण कुठे आहोत ते समजते, असे त्यांचे म्हणणे. व्यवसायात टिकून राहायचे असेल तर दूरचा विचार करणे गरजेचे असते, आणि चुका झाल्यास त्या सुधारण्याची तयारीही हवी, असे राजकुमार चोरडिया सांगतात. आपल्या किराणा दुकानात येणाऱ्या चोखंदळ पुणेकरांच्या प्रतिक्रियांमधून शिकलो, हेही नमूद करायला ते विसरत नाहीत.
sampada.sovani@expressindia.com