लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातून भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आणि पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपाने आज त्यांच्या लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत महाराष्ट्रातील २० उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे. भाजपाने यावेळी मुरलीधर मोहोळ यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मुरलीधर मोहोळ समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसभा निवडणुकीसाठी मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी मिळेल, अशी पहिल्यापासूनच चर्चा होती. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी राष्ट्रीय प्रचारक सुनील देवधर आणि माजी आमदार, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची नावेदेखील चर्चेत आली होती. त्याचबरोबर माजी खासदार संजय काकडे यांनीदेखील पुण्यातून उमेदवारी मिळावी यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली होती. परंतु, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय अशी मोहोळ यांची पक्षात ओळख आहे. अन्य पक्षातील नेत्यांबरोबरही त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे मोहोळ यांनाच उमेदवारी मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. त्यानुसार बुधवारी मोहोळ यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. पक्षाकडून अधिकृतरित्या उमेदवारी जाहीर झाल्यावर मुरलीधर मोहोळ यांनी आनंद व्यक्त केला.

मोहोळ यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. अशातच मोहोळ यांचे मित्र आणि मराठी चित्रपट दिग्दर्शक तथा अभिनेते प्रवीण तरडे यांनीदेखील मोहोळ यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तरडे यांनी फेसबूकवर एक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्यानी म्हटलं आहे की, मित्रवर्य मुरलीधर खूप शुभेच्छा. सांस्कृतिक पुण्याला सुसंस्कृत खासदार मिळावा ही प्रत्येक पुणेकराची ईच्छा पूर्ण होण्याच्या दृष्टीने आज पहिलं पाऊल पडलं. मुरलीधर मोहोळ प्रत्येक पुणेकराची पहीली पसंती असेल यात शंका नाही. कारण पुण्याचा महापौर असताना आमच्या या मित्रानं कोरोना काळात कुटुंब जपावं तसं अख्खं पुणे शहर जपलं. त्यामुळे आता देशासाठी महत्वाच्या असलेल्या या निवडणुकीत पुणेकर त्याला विक्रमी मताधिक्क्याने मोदींचा शिलेदार म्हणून दिल्लीला पाठवतील. रांगड्या मातीतला हा देखणा मुरलीधर त्याच्या आक्रमक कामाबरोबरच लाघवी स्वभावासाठीसुध्दा प्रसिद्ध आहे. त्याचं वय पहाता पुढची २५ वर्षे पुण्याला खंबीर नेतृत्वाचा हंबीर सरसेनापती मिळाला असच वाटतंय.

हे ही वाचा >> भाजपाकडून महाराष्ट्रातल्या चार विद्यमान खासदारांचा पत्ता कट, नव्या चेहऱ्यांना संधी, मोदींचं धक्कातंत्र!

भाजपाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीनुसार हिना गावित यांना नंदुरबार, सुभाष भामरे-धुळे, स्मिता वाघ – जळगाव, रक्षा खडसे – रावेर, अनुप धोत्रे – अकोला, रामदास तडस – वर्धा, नितीन गडकरी – नागपूर, सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर, प्रतापराव चिखलीकर – नांदेड, रावसाहेब दानवे – जालना, भारती पवार – दिंडोरी, कपिल पाटील – भिवंडी, पियूष गोयल – उत्तर मुंबई, मिहिर कोटेचा – मुंबई उत्तर पूर्व, मुरलीधर मोहोळ – पुणे, सुजय विखे पाटील – अहमदनगर, पंकजा मुंडे – बीड, सुधाकर श्रृंगारे – लातूर, रणजीत सिंह नाईक निंबाळकर – माढा आणि संजयकाका पाटील यांना सांगलीतून लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pravin tarde congratulate murlidhar mohol of pune lok sabha candidature by bjp asc