शिक्षण संस्थाचालकांच्या ‘महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन’ (मेस्टा) या संघटनेतर्फे सोमवारी मेळाव्याचे आयोजन केले आहे. दरम्यान शासनाने ३० एप्रिल रोजी काढलेला पूर्व प्राथमिक प्रवेशाबद्दलचा अध्यादेश मागे घ्यावा, अशी भूमिका शिवसेनेने मांडली असून हा मुद्दा संस्थाचालकांच्या मेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता आहे.
शिवाजीनगर येथील न्यू आर्ट गॅलरी येथे ‘मेस्टा’चा मेळावा होणार आहे. शालेय प्रवेशांमध्ये पूर्व प्राथमिक स्तरापासून पंचवीस टक्के आरक्षित जागांचे धोरण राबवले जावे आणि हे प्रवेश रद्दबातल ठरवणारा शासनाने नुकताच काढलेला अध्यादेश मागे घ्यावा या मागण्या करत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी शिक्षण आयुक्तांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते. या मुद्दय़ावरून मंगळवारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याबरोबर बैठकही होणार आहे.
राज्यातील शाळा पूर्वप्राथमिक वर्गापासून सुरू होत असल्यामुळे वंचित आणि दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू होते त्या वर्गापासून जागा राखीव ठेवण्याची तरतूद राज्याच्या अध्यादेशात करण्यात आली होती. मात्र, शासनाने पूर्वप्राथमिक शाळांना शुल्काचा परतावा न देण्याची भूमिका घेतल्यामुळे पूर्वप्राथमिकच्या वर्गाना प्रवेशच न देण्याची भूमिका संस्थाचालकांनी घेतली. त्याचवेळी राज्यातील पंचवीस टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियाही शासनाने राबवली. मात्र, आता शासनाने पूर्वप्राथमिक वर्गाना आरक्षण लागू होत नसल्याचे सांगत आतापर्यंत देण्यात आलेले प्रवेशही रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे प्रवेश मिळालेली शाळा सोडणे किंवा शाळेचे लाखो रुपयांच्या घरातील शुल्क भरणे, एवढेच पर्याय वंचित आणि दुर्बल घटकातील पालकांसमोर राहणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा