पुणे: कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात उद्या, गुरुवारी, तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात शुक्रवारी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग्नेय दिशेने येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे गुरुवार, २३ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. शुक्रवार, २४ नोव्हेंबर रोजी कोकण, संपूर्ण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणांसह विदर्भातील यवतमाळ, वाशिम आणि अकोल्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हेही वाचा… पिंपरी-चिंचवडमध्ये ११३६ अधिकृत जाहिरात फलक; महापालिकेचा दावा
मुंबईत शनिवार, २५ आणि रविवारी २६ नोव्हेंबर रोजी हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. राज्यात पुढील चार दिवसांत तुरळक ठिकाणी वेगाने वारे वाहून जोरदार सरी पडण्याचीही शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. राज्यात सोमवार, २७ नोव्हेंबरपर्यंत ढगाळ हवामान राहण्याचा अंदाज आहे. त्यानंतर हवामान कोरडे राहून किमान तापमानात वेगाने घट होण्याची शक्यता आहे.