‘स्कूलगुरू एज्युसव्‍‌र्ह’च्या पाहणीतील निष्कर्ष

भारतातील ऑनलाइन अभ्यासक्रमांची नोंदणी २०२२ पर्यंत १४.५ टक्कय़ांनी वाढण्याची अपेक्षा आहे. तसेच सद्य:स्थितीत ऑनलाइन अभ्यासक्रमांसाठी ८० टक्के विद्यार्थी मोबाइलचा वापर करतात. मात्र, अभ्यास साहित्य वापरण्यासाठी किंवा सरावासाठी संगणकाचा वापर करतात, असे एका पाहणीतून स्पष्ट झाले आहे.

‘ऑनलाइन शिक्षणातील संधी आणि कल’ या अनुषंगाने ‘स्कूलगुरू  एज्युसव्‍‌र्ह’तर्फे पाहणी करण्यात आली. त्या पाहणीत भारतातील ऑनलाइन अभ्यासक्रमांसह २०२२ पर्यंत भारतातील उच्च शिक्षणाच्या स्थितीचाही आढावा घेण्यात आला. या पाहणीनुसार, भारतातील उच्च शिक्षणाची उलाढाल २०२२ पर्यंत ६.९ टक्कय़ांनी वाढण्याची शक्यता आहे. त्यात २०१८ मधील पदवी आणि पदविकांचे प्रमाण ३.६६ कोटींवरून २०२२ मध्ये ४.६३ कोटींवर जाण्याची, ऑनलाइन पदवी आणि पदविका अभ्यासक्रमांचे प्रमाण १४.५ टक्कय़ांनी वाढून ६३.६३ लाखांवर जाण्याची अपेक्षा आहे. २०१८-२०२२ दरम्यान रिस्किलिंग आणि प्रमाणीकरण ३८ टक्कय़ांनी वाढून त्याची उलाढाल ३ हजार ३३३ कोटींवर पोहोचण्याची शक्यता आहे.

पदवी अभ्यासक्रमांमध्ये कला शाखेला सर्वाधिक पसंती आहे. त्यानंतर विज्ञान आणि वाणिज्य शाखेचा क्रमांक लागतो. मात्र, पदव्युत्तर पदवीसाठी विद्यार्थी समाजशास्त्र, व्यवस्थापन आणि मूलभूत विज्ञानाची निवड केली जाते. ४२ टक्के विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रम संपताना रोजगार मिळावा असे वाटते. ९४ टक्के विद्यार्थी त्यांच्या प्रादेशिक भाषेतून माध्यमिक शिक्षण घेतात. त्यात हिंदी भाषेचा वापर सर्वाधिक होतो. त्यामुळे विद्यापीठांनीही ऑनलाइन अभ्यासक्रमांमध्ये प्रादेशिक भाषांचे पर्याय उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचेही अहवालात म्हटले आहे.

‘व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी’चाही शिक्षणात समावेश

गेल्या पाच वर्षांत ऑनलाइन अभ्यासक्रमांकडील ओढा मोठय़ा प्रमाणात वाढला असून, ‘व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी’ आणि ‘ऑग्मेंटेड रिअ‍ॅलिटी’चाही त्यात समावेश होणार असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.