नगरसचिव विभागाच्या कामाचा भरपूर अनुभव असल्याचे सांगत पाणी, स्वच्छता यासारख्या नागरी सुविधांना प्राधान्य देणार असल्याचे पिंपरी पालिकेचे नवे आयुक्त राजीव जाधव यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. विषय समित्या, स्थायी समिती तसेच महासभेच्या निर्णयांना आयुक्त बांधील असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. श्रीकर परदेशी यांची बदली झाल्यानंतर रत्नागिरीचे जिल्हाधिकारी जाधव यांनी सोमवारी पिंपरी पालिका आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. परदेशी यांच्याशी त्यांनी पालिकेच्या विविध विषयांवर प्रदीर्घ चर्चा केली, त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे या वेळी उपस्थित होते.
जाधव म्हणाले,की १९९८ पासून आपण प्रशासकीय सेवेत आहोत. मूळ बीडचे असून शेतकरी कुटुंबातील व ग्रामीण पाश्र्वभूमीतून आलो आहे. राज्याच्या विविध भागात विशेषत: नगरविकासात काम केले असून त्याचा उपयोग महापालिका आयुक्त म्हणून काम करताना होईल. शक्य तितके चांगले व नियमानुसार काम करू, सर्वाना बरोबर घेऊ, कोणाची दिशाभूल करणार नाही. वेळप्रसंगी मार्गदर्शन करू. सर्वासाठी आपले दरवाजे खुले असून नागरिकांसाठी कधीही उपलब्ध राहू. वाढती लोकसंख्या, शहराची वाढती व्याप्ती तसेच उत्पन्नवाढीच्या दृष्टीने विचार करू. परदेशी यांच्या सारथीसारख्या चांगल्या योजना यापुढे सुरू ठेवू. न्यायालयाचा अवमान होणार नाही, याची खबरदारी घेऊन अनधिकृत बांधकामाविषयीचे धोरण ठरवू. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या मंत्रीगटाच्या समितीचा निर्णय अपेक्षित असून त्याची प्रतीक्षा करू. पालिका स्तरावर काम करताना विषय समित्या, स्थायी समिती तसेच पालिका सभांमध्ये होणाऱ्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यास बांधील राहणार असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Preference to civil amenities rajiv jadhav