पुणे: करोना काळात सातत्याने लावण्यात आलेली टाळेबंदी, विविध निर्बंध यांमुळे अर्थचक्र रुतले होते. या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय बुडाले. त्याचा परिणाम म्हणून करोनानंतर नोंदणी पद्धतीने विवाहांत वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे. चालू वर्षात पुण्यात तब्बल सहा हजार नोंदणी विवाह पार पडले आहेत. अद्याप डिसेंबर महिना शिल्लक असून या महिन्यात नोंदणी विवाहांत आणखी वाढ होणार असल्याचे नोंदणी विवाह अधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले.
पत्रिका आणि मुहूर्त पाहून विवाह करण्याकडे अनेकांचा कल असतो. त्याबरोबरच नोंदणी पद्धतीने विवाह (रजिस्टर्ड मॅरेज) करणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे. नवी पिढी पत्रिकेवर फारसा विश्वास ठेवत नसल्याने आपल्या सोयीप्रमाणे विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन लग्न केले जाते. या कार्यालयात नोंदणी करून होणारे विवाह विशेष विवाह कायद्यानुसार होतात. त्यामध्ये जात, धर्माचा अडथळा नसतो. विवाहाच्या वेळी किचकट प्रक्रियाही नसल्याने नोंदणी करून विवाह करण्याचे प्रमाण वाढत आहे.
हेही वाचा >>> पुणे: मैत्रीचे फसवे जाळे; सायबर पोलिसांकडे ‘सेक्सटाॅर्शन’च्या १४०० तक्रारी
दरम्यान, यंदा चालू वर्षात आतापर्यंत सहा हजार नोंदणी विवाह शहरासह जिल्ह्यात झाले आहेत. विवाह नोंदणी अधिकाऱ्यांकडे नोटीस आणि त्यासाठी आवश्यक पुराव्यांची कागदपत्रे जमा केल्यानंतर ३० दिवसांच्या आत कोणत्याही प्रकारचा आक्षेप न आल्यास वधू आणि वर तीन साक्षीदारांसमक्ष अधिकाऱ्यांसमोर विवाह करू शकतात. विवाहाचे प्रमाणपत्रही लगेच देण्याची व्यवस्था दुय्यम निबंधक कार्यालयात करण्यात आली आहे. मुंबई, मुंबई उपनगर आणि पुणे अशा तीन जिल्ह्यांसाठी स्वतंत्र विवाह नोंदणी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत, अशी माहिती पुण्याच्या विवाह नोंदणी अधिकारी एल. एम. संगावार यांनी दिली.
वर्ष आणि नोंदणी विवाहांची संख्या (पुणे शहर, जिल्हा)
२०१९ ४८९६
२०२० ३८४२
२०२१ ५२०६
२०२२ ६०००