गरोदरपणाच्या नवव्या महिन्यातील स्त्रियांसाठी १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका सेवेतर्फे विशेष सेवा सुरू करण्यात आली असून त्याद्वारे शासनाकडे नोंदणी केलेल्या गरोदर स्त्रियांना रुग्णवाहिका सेवेकडून दूरध्वनी केला जात आहे. बाळंतपणाच्या कळा सुरू होणार असे वाटल्यानंतर रुग्णवाहिका बोलवण्यास उशीर केला जाऊ नये आणि लवकर मदत मिळून मातामृत्यू व अर्भक मृत्यू टाळता यावेत, असा या सेवेचा उद्देश आहे.
शासनाच्या आरोग्य खात्यासह बीव्हीजी इंडिया कंपनीतर्फे पुरवल्या जाणाऱ्या १०८ क्रमांकाच्या मोफत अत्यावश्यक सेवेला (एमईएमएस) २६ जानेवारी २०१४ पासून  सुरू झाली. तेव्हापासून आतापर्यंत पुण्यात ७,५७० गरोदर स्त्रियांना आणीबाणीच्या प्रसंगी या सेवेचा आधार मिळाला आहे.
दररोज राज्यात १० ते १५ बाळंतपणे रुग्णवाहिकेत होत असून डॉक्टर ही आणीबाणी सुरक्षितपणे हाताळतात, असे एमईएमएस यंत्रणेचे संचालक डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘रोजच्या आकडेवारीनुसार ३५ ते ४० टक्के म्हणजे साधारणत: ४०० ते ४५० गरोदर स्त्रियांना १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका मदत करत आहेत. गरोदरपणाच्या नवव्या महिना सुरू असलेल्या स्त्रियांना आम्ही १०८ रुग्णवाहिका यंत्रणेतर्फे दूरध्वनी करण्यास सुरुवात केली आहे. नवव्या महिन्याच्या प्रत्येक आठवडय़ात असा दूरध्वनी केला जातो. दवाखान्यात जाण्यासाठी त्यांना रुग्णवाहिकेची गरज आहे का, ते विचारले जाते. बाळंतपणाच्या कळा सुरू होणार असे वाटल्यावर रुग्णवाहिकेला दूरध्वनी करण्यास उशीर करू नये, तसेच गुंतागुंती टाळण्यासाठी दवाखान्यात वेळोवेळी तपासणी गरजेची आहे हेही सांगितले जाते. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ापासून यासाठीचा पायलट प्रकल्प चालवला गेला. जूनपासून हा प्रकल्प पूर्णत: सुरू केला जात आहे. ‘मदर अँड चाइल्ड ट्रॅकिंग सिस्टिम’ या प्रकल्पाअंतर्गत गोळा होणारी गरोदर मातांची आकडेवारी यासाठी वापरली जाते.’
राज्यात दररोज सुमारे ४ हजार बाळंतपणे होत असून त्यातील ४० ते ५० टक्के बाळंतपणे खासगी रुग्णालयात, तर ५० ते ६० टक्के शासकीय रुग्णालयात होतात. शासकीय रुग्णालयात होणाऱ्या बाळंतपणांपैकी २० ते २५ टक्के गरोदर स्त्रिया १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची मदत घेऊन रुग्णालयात दाखल झालेल्या असतात, असेही डॉ. शेळके यांनी सांगितले.                                                       

१०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकांची पुण्यातील कामगिरी
पुणे जिल्ह्य़ात १०८ क्रमांकाच्या ८४ रुग्णवाहिका आहेत. त्यातील ३१ रुग्णवाहिका पुणे शहरात, तर १० पिंपरी- चिंचवड शहरात उपलब्ध आहेत. पुण्यात या रुग्णवाहिकांनी २२,११८ आणीबाणीचे प्रसंग हाताळले आहेत. अर्धागवायू, ओटीपोटात दुखणे, तीव्र डोकेदुखी, श्वास घ्यायला त्रास होणे, दम्याचा अचानक त्रास, हगवण अशा विविध वैद्यकीय आणिबाणींमध्ये या रुग्णवाहिकांनी ८,३५७ रुग्णांचा जीव वाचवला. ७,५७० गरोदर स्त्रियांना आणि रस्ता अपघातांमधील २,८८३ जखमींनाही या रुग्णवाहिकांची मदत झाली. हृदयासंबंधीच्या १९३ आणीबाणी या रुग्णवाहिकांनी हाताळल्या आहेत.