पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क सेवा परीक्षेमध्ये महत्त्वाचा बदल केला आहे. त्यानुसार गट ब आणि गट क सेवेतील विविध संवर्गांची स्वतंत्र पूर्व परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही सेवांसाठी अभ्यासक्रम पूर्वीप्रमाणेच राहणार असून, गट ब आणि गट क असा सेवानिहाय पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> शक्तिप्रदर्शनाद्वारे पुण्यातील इच्छुकांच्या मुलाखती; ग्रामीण भागामध्येही मुलाखती

एमपीएससीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. एमपीएससीने विविध स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्याचे १ ऑगस्ट २०२२ रोजी जाहीर केले होते. त्यानुसार महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क सेवा परीक्षेसाठी १९ जानेवारी रोजी परीक्षा योजना प्रसिद्ध करण्यात आली होती. या परीक्षा योजनेतील तरतुदीनुसार  महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ साठी जाहिरात प्रसिद्ध करून दोन्ही सेवांची संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात आली. मात्र परीक्षेच्या निकाल प्रक्रियेदरम्यान आलेल्या तांत्रिक अडचणी, न्यायालयीन प्रकरणे, निकाल प्रक्रियेस होणारा विलंब लक्षात घेऊन या परीक्षा योजनेत सुधारणा करण्याचे एमपीएससीच्या विचाराधीन होते, असे नमूद करण्यात आले आहे. 

हेही वाचा >>> शेती शेतकऱ्यांच्या नव्हे व्यापारी, विक्रेत्यांच्या फायद्याची ? जाणून घ्या, रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या अहवालातील धक्कादायक माहिती

एमपीएससीच्या कक्षेबाहेरील सर्व शासकीय कार्यालयातील गट ब (अराजपत्रित) गट क संवर्गातील (वाहनचालक वगळून) पदे सरळसेवेने  एमपीएससीमार्फत भरण्याबाबत राज्य शासनाने १८ जुलै २०२४ रोजी निर्णय घेतला आहे. त्यानुसार शासनाच्या विविध विबागांतील गट ब (अराजपत्रित) आणि गट क या सेवेतील विविध संवर्गांची भरती प्रक्रिया एमपीएससीमार्फत केली जाणार आहे. या गट ब (अराजपत्रित) आणि गट क सेवेतील विविध संवर्गांची वाढणारी संख्या, त्या अनुषंगाने परीक्षा देणाऱ्या उमेदवारांच्या संख्येत होणारी वाढ, २०२३च्या निकाल प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी, न्यायालयात दाखल प्रकरणे, न्यायालयाचे निर्णय, निकालास होणारा विलंब लक्षात घेऊन गट ब आणि गट क सेवेतील विविध संवर्गांची स्वतंत्र पूर्व परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त परीक्षा आणि महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षेच्या परीक्षा योजना संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील.