पुणे: शहरी गरीब योजनेंतर्गत पूना हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर आठ तासांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. याप्रकरणी महापालिकेच्या आरोग्य विभागाने रुग्णालयावर प्रथमदर्शनी ठपका ठेवून नोटीस बजावली आहे. या नोटिशीला उत्तर देण्यास रुग्णालयाला २४ तासांचा अवधी देण्यात आला आहे.
पूना हॉस्पिटलमध्ये महेश पाठक (वय ५३, शुक्रवार पेठ) उपचार घेत होते. त्यांचा २५ एप्रिलला रात्री १.३० वाजता मृत्यू झाला. पाठक यांच्यावर शहरी गरीब योजनेअंतर्गत उपचार सुरू होते. मात्र, देयकाच्या कारणावरून त्यांच्या मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यास नकार देण्यात आला.
नातेवाईकांकडे सुरूवातीला पूर्ण देयकाची रक्कम रुग्णालय प्रशासनाने मागितली. त्यानंतर देयक भरण्याची तयारी दाखवूनही प्रशासनाने मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला नाही. अखेर सकाळी ९.३० वाजता आठ तासांनी रुग्णाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला, अशी तक्रार नातेवाईकांनी केली होती.
या प्रकरणी रुग्णाचे नातेवाईक निलेश महाजन यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे २५ एप्रिलला लेखी तक्रार केली होती. या तक्रारीची चौकशी आरोग्य विभागाने केली. त्यानंतर आरोग्य विभागाने पूना हॉस्पिटलला नोटीस बजावली आहे. या नोटिशीत रुग्णालयाने कर्तव्यात कसूर केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
ही बाब गंभीर स्वरूपाची असल्याने कायदेशीर बाबींचे उल्लंघन रुग्णालयाने केले आहे. त्यामुळे नोटीस मिळाल्यानंतर २४ तासांत वस्तुस्थितीदर्शक अहवाल संबंधित डॉक्टरांच्या खुलासा पत्रासह सादर करण्याचे निर्देशही आरोग्य विभागाने रुग्णालयाला दिले आहेत.