आपल्याकडील एखादी वस्तू वापरात नाही, पण ती इतर कोणास वापरण्यायोग्य असेल तर…? हा प्रश्न आपल्याला कधीच पडत नाही. अनेकदा हौशीपोटी आपण वस्तूंची खरेदी करतो. काही दिवस सातत्याने त्या जेवढ्या वापरता येतील तेवढ्या वापरतो आणि अगदी प्रेमाने वापरतो; पण त्यापेक्षा थोडीशी अधिक उत्तम प्रकारची म्हणजेच ‘अपडेटेड’ वस्तू आली, की आधीच्या वस्तूचे काय करायचे, असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी एक छान, सोपे उत्तर पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या पुण्यातील एका संस्थेने शोधले आहे. या कल्पनेला मूर्त रूप दिले आहे एका कंपनीतील कर्मचाऱ्यांनी.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या ‘सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज्’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ‘प्रीलव्हड् इको हाट’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची सुरुवात पुण्यातील ‘व्हीके ग्रुप’च्या कर्मचाऱ्यांनी केली. ‘प्रीलव्हड् इको हाट’ हे या उपक्रमाचे प्रदर्शन. या प्रदर्शनामध्ये वापरलेल्या उत्पादनांची, कपड्यांची अदलाबदल, विक्री आणि दान एकाच व्यासपीठावर होणे शक्य झाले आहे. बोर्ड गेम्स, पुस्तके, पादत्राणे, दागिने, शोभेच्या वस्तू, तसेच कपड्यांपासून ते बॅग, पर्स आणि पेंटिंगपर्यंत अनेक वस्तू या प्रदर्शनात आहेत.

हेही वाचा – पुणे : डेअरीत आग लागून मालकाचा मृत्यू, सुखसागरनगर भागातील घटना

सेनापती बापट रस्त्यावरील व्हीके ग्रुपच्या कार्यालयात दर महिन्याच्या चौथ्या सोमवार, मंगळवार आणि बुधवारी या वस्तू प्रदर्शित केल्या जातात. या उपक्रमास खूप चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत या प्रदर्शनाद्वारे दोनशेहून अधिक वस्तूंची देवाणघेवाण झाली आहे. हा उपक्रम केवळ वापरलेल्या वस्तूंची अदलाबदल करणे, विक्री करणे किंवा देणगी देण्याबद्दल नव्हे, तर एक अर्थपूर्ण मार्गाने टिकाऊपणा स्वीकारण्यासाठी एकत्र येण्याबद्दल आहे. ‘सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज्’च्या ट्रस्टी पूर्वा केसकर, अनघा परांजपे-पुरोहित, हृषीकेश कुलकर्णी, अपूर्वा कुलकर्णी, विजय साने, अमोल उंबरजे आणि ‘व्हीके ग्रुप’च्या वैशाली आठवले व मेघना पिंगळे यांच्या समन्वयातून हा उपक्रम राबविला जातोय.

पर्यावरणासाठी एक पाऊल पुढे जाऊन आम्ही या उपक्रमाची सुरुवात केली. पूर्वी भारतात वस्तूंची देवाणघेवाण खूप होत असे. आपण दुकानदाराकडे साड्या देऊन भांडी घ्यायचो, मोठ्यांचे कपडे छोट्या भावंडांना वापरायला द्यायचो, धान्य देऊन किराणा माल घ्यायचो. त्यामुळे सर्व वस्तूंचा पुनर्वापर होत असे. ‘सस्टेनेबिलिटी’ घराघरांत राबवली जाई. याची एक समांतर अर्थव्यवस्था होती. ही संस्कृती टिकून राहावी यासाठी आम्ही आमच्या कार्यालयात या उपक्रमाची सुरुवात केली. आपल्याला आवश्यक नसलेल्या वस्तूंना नवीन जीवन देऊन, आपण एकत्रितपणे कचरा कमी करू शकतो आणि पर्यावरणावर सकारात्मक परिणाम करू शकतो, असे ‘सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज्’च्या ट्रस्टी अपूर्वा कुलकर्णी यांनी सांगितले.

हेही वाचा – पुणे : डेअरीत आग लागून मालकाचा मृत्यू, सुखसागरनगर भागातील घटना

कर्मचाऱ्यांमध्ये शाश्वत मानसिकता निर्माण करण्यासाठी ‘प्रीलव्हड् इको हाट’सारखे उपक्रम महत्त्वाचे आहेत. आमच्यासाठी एकत्र येण्याची, एकमेकांना आधार देण्याची आणि आमच्या शाश्वतता उद्दिष्टांमध्ये योगदान देण्याची ही एक उत्तम संधी आहे. अशा प्रकारचे उपक्रम अनेक कार्यालयांमध्ये राबविले पाहिजेत. हे उपक्रम आपल्या कोणत्या ऑफिसमध्ये सुरू करावयाचे असल्यास आम्ही ‘सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज्’च्या माध्यमातून सहकार्य करू, असे आयोजक अमोल उंबरजे आणि ‘व्हीके ग्रुप’च्या वैशाली आठवले व मेघना पिंगळे यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Preloved eco haat initiative exchange sale and donation of used products clothes can be done on a single platform pune print news sso 25 ssb