काही काही हॉटेलची नावं फार वैशिष्टय़पूर्ण असतात. काही हॉटेलांमध्ये मिळणाऱ्या पदार्थाची नावं वैशिष्टय़पूर्ण असतात. काही हॉटेल अशी असतात की त्यांच्या पाटीवरचं नाव एक असतं आणि त्या हॉटेलंच प्रसिद्ध नाव वेगळंच असतं. शुक्रवार पेठेतलं ‘प्रेमाचे साई हॉटेल’ हे देखील असंच एक ठिकाण. तमाम खाद्यप्रेमींमध्ये या हॉटेलची ओळख ‘प्रेमाचे हॉटेल’ अशीच आहे. अर्थात ही ओळख एवढय़ावरच थांबत नाही. खरी गंमत पुढे आहे. या हॉटेलमध्ये मिळणाऱ्या सर्व पदार्थाची नावं देखील प्रेमाने या शब्दाने सुरू होतात. म्हणजे ती नावं देखील ‘प्रेमाचे पोहे’, ‘प्रेमाचे उपीट’, प्रेमाचा चहा’.. अशी आहेत. हे वाचून कदाचित तुमचा विश्वास नाही बसणार. पण तुम्ही प्रत्यक्ष भेट दिलीत तर या हॉटेलमध्ये तुमच्याही कानावर ‘यांना प्रेमाने पोहे दे’, ‘त्यांना प्रेमाने दोन चहा दे’ अशीच वाक्य कानावर पडतील.

आलेल्या ग्राहकांना इथे कधी उद्धटपणाची, अरेरावीची वागणूक मिळत नाही. जे काही कानावर पडते ते सारे प्रेमाचे. या हॉटेलचे मालक रामचंद्र शंकर रेणुसे ऊर्फ रामभाऊ. हॉटेल व्यवसायामुळे रामभाऊंचा गोतावळा आणि मित्रपरिवार खूप मोठा आहे. ते मूळचे वेल्हा तालुक्यातील लव्ही बुद्रुक या छोटय़ा गावातले. कामधंद्यासाठी बाराव्या वर्षीच त्यांनी मुंबईचा रस्ता धरला. शिक्षण होतं सहावी पास. सुरुवातीला एका हॉटेलमध्ये काम आणि नंतर तब्बल आठ वर्ष दादर स्टेशनच्या बाहेर चालवल्या जाणाऱ्या एका बाकडय़ावरील चहाच्या ठेल्यावर त्यांनी काम केलं. आठ वर्षांच्या या अनुभवानंतर त्यांनी दादर स्टेशनच्या बाहेर चहाचा स्वत:चा स्टॉल सुरू केला. पहाटे तीन ते सकाळी सात चहाचा स्टॉल आणि नंतर दुपारी चार ते रात्री दहा या वेळेत सँडविचची गाडी. हा व्यवसाय दहा र्वष उत्तमरीत्या चालू होता. मात्र पुढे रस्त्यावरच्या या व्यवसायात अडचणी यायला लागल्यामुळे रामभाऊ व्यवसायाच्याच निमित्तानं पुण्यात आले. ते वर्ष होतं २०१०.

मंडई परिसरात रामभाऊंनी चहाची गाडी सुरू केली आणि अगदी थोडय़ाच दिवसात त्यांचा चांगलाच जम बसला. मुंबईतला अनुभव गाठीशी होताच आणि उत्कृष्ट चहा करण्याचं तंत्रही आत्मसात झालेलं होतं. त्यामुळे गाडीवरचा व्यवसाय बहरला. त्यातून रामभाऊंनी जवळच एक दुकानही घेतलं. तिथे विद्यार्थी आणि नोकरी-व्यवसाय करणाऱ्यांसाठी मेस सुरू केली. पाठोपाठ सदाशिव पेठेत प्रेमाचे साई हॉटेल सुरू केलं आणि दिवाळीत शुक्रवार पेठेतील जागेत आणखी एक हॉटेल सुरू केलं. रामभाऊंच वागणं, बोलणं मुळातच कुणीही मैत्रीत पडावं असं. त्यांची कुणाशीही चटकन मैत्री होते. हॉटेल व्यवसायाचा पसारा त्यांनी स्वकर्तृत्वानं वाढवला असला तरी आजही चहाच्या भट्टीवर किंवा भटारखान्यात पोहे तयार करताना, पोह्य़ांच्या डिश भरताना रामभाऊ दिसतात. चहाची गाडी होती, तेव्हापासून कुणालाही चहा देताना ‘अहो, प्रेमाने चहा घ्या’ असं रामभाऊ म्हणायचे. चहाची चव वेगळी होतीच आणि त्यात असं अगत्य. गोड भाषा. त्यामुळे सगळेजण या चहाला रामभाऊंचा प्रेमाचा चहा असं म्हणायला लागले. पुढे हॉटेल सुरू झाल्यानंतर तिथल्या पदार्थानाही तशीच नावं पडली. प्रेमाचे पोहे, प्रेमाचे उपीट.. अर्थात, फक्त नाव वेगळं आहे म्हणून खवय्यांची इथे गर्दी होते असा प्रकार मात्र अजिबात नाही. इथे सतत गर्दी होते ती तिथल्या चवीष्ट पदार्थामुळे. पोहे, उपीट हे पदार्थ दहा रुपयात आणि अर्धी प्लेट सहा रुपयात देणारे अनेकजण हल्ली पुण्यात चौकाचौकात उभे असतात. रामभाऊंकडे पोहे, उपीट या डिश पंचवीस रुपयांना आहेत; पण एकदा घाणा तयार झाला की तो पाहता पाहता संपून जातो, एवढी त्यांना मागणी असते. या सगळ्या पदार्थासाठी जो कच्चा माल वापरावा लागतो तो ताजा आणि दर्जेदार लागतो. त्यात कधीही फरक करत नाही. त्यामुळे चव कायम राहते आणि ग्राहक देखील पदार्थाना दाद देतात, असं रामभाऊ सांगतात. हॉटेल उद्योगात चांगला जम बसल्यानंतरही ते स्वत: सगळी कामं करताना दिसतात. इथल्या चहाला बासुंदी चहा असं नाव आहे आणि ते अगदी अचूक असंच आहे. निव्वळ घट्ट दुधाचा वापर करून आटवून आटवून हा चहा तयार केला जातो आणि त्याचा दाटपणा खरोखरच वेगळी चव देतो.

रामभाऊंची दोन्ही हॉटेल म्हणजे मराठी धाटणीचं एक वेगळं ठिकाण आहे. अस्सल मराठी हॉटेलचा अनुभव तिथे येतो. तो अनुभव घ्यायलाच हवा.

कुठे आहे..

१) शुक्रवार पेठेत बदामी हौदाजवळ

२) सदाशिव पेठेत, पुणे विद्यार्थी गृहाजवळ

  • सकाळी सात ते दुपारी एक पर्यंत चहा, नाश्ता
  • दुपारी एक ते रात्री आठ पर्यंत चहा