पुणे : अकाली जन्मलेल्या बाळाने स्तनपानाचा स्वीकार बंद केल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी तपासणीत रोटाव्हायरस संसर्गामुळे त्याच्या मेंदूला सूज आल्याची गंभीर बाब समोर आली. डॉक्टरांनी वेळीच निदान अणि अत्याधुनिक उपचार केल्याने बाळाने या संसर्गावर मात केली आहे.

आयव्हीएफ (इन व्हिट्रो फर्टिलाइझेशन) म्हणजे कृत्रिम गर्भधारणेच्या माध्यमातून एका महिलेने जुळ्या बाळांना जन्म दिला. या बाळांचा जन्म ३५ व्या आठवड्यांमध्ये झाला होता. त्यातील एका बाळाने स्तनपानाचा स्वीकार बंद केल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले. या बाळामध्ये बाह्य लक्षणे फारशी दिसत नव्हती. वैद्यकीय पथकाने अत्याधुनिक पद्धतीने दुर्मीळ अशा चेताविकार स्थितीचे निदान केले. त्यात बाळाला रोटाव्हायरल एन्सेफलायटीस म्हणजेच रोटाव्हायरस संसर्गामुळे मेंदूला येणाऱ्या सूजेचे निदान झाले. त्यामुळे वैद्यकीय पथकाने बाळावरील उपचाराचे नियोजन केले.

या अकाली जन्मलेल्या आणि गंभीर गुंतागुंत असलेल्या बाळावर पुण्यातील अंकुरा हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभागातील पथकाच्या मदतीने या प्रकरणात संसर्गाचे यशस्वीरीत्या व्यवस्थापन करण्यात आले. त्यातून दीर्घकालीन चेताविकार समस्या टाळता आल्या. बाळाच्या हृदयाचे ठोके आणि श्वासोच्छ्वास स्थिर झाल्याने, उपचारादरम्यान १२ व्या दिवसांपासून बाळाच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली. बाळाची चेताविकार स्थिती १६ व्या दिवसापर्यंत सामान्य झाली. त्याच्या ईसीजीमध्ये कोणतीही असामान्य लक्षणे आढळून आली नाहीत. त्यामुळे बाळाला १७ व्या दिवशी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. बाळाच्या प्रकृतीची नियमितपणे तपासणी करण्याचा सल्ला डॉक्टरांनी पालकांना दिला आहे.

नवजात मुलांमध्ये ताप तसेच संसर्ग किंवा चयापचय संबंधित समस्यांसारखी लक्षणे आढळून येतात. रोटाव्हायरस एन्सेफॅलोपॅथीचे क्वचितच निदान होते. या प्रकरणात वेळीच निदान महत्त्वाचे ठरले. वेळीच निदानामुळे नवजात बाळाच्या संसर्गावरील उपचारांचे अचूक व्यवस्थापन करण्यात आले. – डॉ. शिजी चालीपट, बाल चेताविकारतज्ज्ञ