पुणे : पुणे रेल्वे स्थानकावरील प्रीपेड रिक्षा बूथ शुक्रवारी सायंकाळपासून बंद झाला. ऐन दिवाळीत यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. बूथ चालविणाऱ्या रिक्षा मित्रच्या कराराचे वाहतूक पोलिसांकडून नूतनीकरण न झाल्याने तो अखेर बंद झाला आहे. आचारसंहितेचे कारण पोलिसांनी यासाठी दिल्याचे समजते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे रेल्वे स्थानक परिसरात बेकायदा व्यवसाय करणारे रिक्षाचालक नागरिकांना अव्वाच्या सव्वा भाडे सांगून आर्थिक लूट करत होते. या प्रकाराला रिक्षामित्र प्रीपेड रिक्षा बूथच्या माध्यमातून चाप बसला होता. गेल्या १०० दिवसांत आत्तापर्यंत अंदाजे २८ हजार प्रवाशांनी बूथचा लाभ वापर केला. प्रवासी सेवा संघासोबत बूथ चालविण्यासाठी रिक्षामित्रने केलेले करार २२ ऑक्टोबरला संपुष्टात आला. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी ६ वाजल्यापासून हा बूथ बंद करण्यात आला. प्रवासी सेवा संघाने रिक्षा मित्रसोबत हा करार केला होता. या संघाचे अध्यक्षपद वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्तांकडे आहे.

आणखी वाचा-मावळातील पवनानगरमध्ये भाजप कार्यकर्त्याचा दगडाने ठेचून खून

याबाबत रिक्षामित्रचे डॉ. केशव क्षीरसागर म्हणाले की, या बूथची प्रायोगिक तत्वावरील मुदत संपली आहे. कराराचे नूतनीकरण न झाल्याने बूथ चालविणे शक्य होणार नाही. काही दिवस बूथ राहिल्यास तिथे प्रामाणिकपणे व्यवसायक करणाऱ्या रिक्षाचालकांना पुन्हा आणणे शक्य होणार नाही. स्थानिक गुंडांच्या विरोधाला न जुमानता १ हजार २११ रिक्षाचालकांनी प्रामाणिकपणे आणि नियमानुसार व्यवसाय करून सामान्य नागरिकांची होणारी लाखो रुपयांची लूट थांबविली.

प्रीपेड रिक्षा बूथचा १०० दिवसांचा प्रवास

रिक्षाचालक – १ हजार २११
प्रवासी – १३ हजार ८७४
एकूण भाडे – २२ लाख ३८ हजार ७६४ रुपये

आणखी वाचा-लक्ष्मीपूजन पारंपारिक उत्साहात, व्यापारी पेठेत आतषबाजी

रिक्षाचालकांकडून लूट पुन्हा सुरू

पुणे रेल्वे स्थानकात रिक्षाचालक प्रवाशांची लूट करीत असल्याच्या तक्रारी वारंवार येतात. प्रीपेड रिक्षा बूथ सुरू झाल्यानंतर या तक्रारी कमी झाल्या होत्या. आता पुन्हा प्रवाशांकडून जास्त भाडे उकळण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. ऐन दिवाळीत रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची संख्या वाढते. याच काळात बूथ बंद झाल्याने काही रिक्षाचालक मनमानी भाडे सांगत आहेत. याकडे वाहतूक पोलिसांकडून कानाडोळा केला जात असल्याची तक्रारही प्रवासी करीत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prepaid rickshaw booth at pune railway station closed due to traffic police pune print news stj 05 mrj