लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाने खचून न जाता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणनीती आखण्यास राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने सुरुवात केली आहे. पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी २८ फेब्रुवारीला पक्षाचे विद्यामान खासदार, आमदार यांच्यासह माजी आमदारांची बैठक बोलाविली आहे. मुंबई येथे ही बैठक होणार आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या याचिकेवर २५ फेब्रुवारीला न्यायालयात सुनावणी होणार आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणाऱ्या निवडणुकांबाबत चर्चा करण्यासाठी ही विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी याला दुजोरा दिला.
राष्ट्रवादी (शरद पवार) पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणती भूमिका घेणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. यावर चर्चा करण्यासाठी शरद पवार यांनी बैठकीचे आयोजन केले असल्याचे पक्षातील पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, गेल्या तीन वर्षांपासून राज्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका यांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. लोकप्रतिनिधींची मुदत संपल्याने सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासकीय कारभार सुरू आहे.