लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : राज्य मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांसाठी पूरक साहित्याची निर्मिती राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) केली आहे. हे पूरक साहित्य एससीईआरटीच्या संकेतस्थळावर विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.

दरवर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षेत अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण होतात. मात्र अनुत्तीर्ण विद्यार्थी शाळाबाह्य होतात किंवा त्यांच्यात नकारात्मक भावना निर्माण होऊन ते त्यांच्या प्रगतीपासून वंचित राहतात. या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे, त्यांना समजेल अशा सोप्या भाषेत आशय निर्मिती करून त्यांच्यापर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून ते दहावी आणि बारावीची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतील. या पार्श्वभूमीवर एससीईआरटीने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विषयनिहाय घटक आणि उपघटकांवर आधारित अभ्यास साहित्याची निर्मिती केली आहे. हे पूरक साहित्य एससईआरटीच्या https://maa.ac.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे.

आणखी वाचा-शिक्षक भरतीबाबत महत्त्वाची बातमी… काय झाला निर्णय?

दहावीसाठीच्या साहित्यामध्ये ऊर्दू, गणित मराठी माध्यम, गणित इंग्रजी माध्यम, इंग्रजी तृतीय भाषा, मराठी या विषयांचा, तर बारावीसाठीच्या अभ्यासक्रमात ऊर्दू, गणित आणि संख्याशास्त्र (विज्ञान) भाग एक, गणित आणि संख्याशास्त्र (विज्ञान) भाग दोन, मराठी, इंग्रजी या विषयांचा समावेश आहे.