राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय समन्वय समितीच्या बैठकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सरसंघचालक, सहकार्यवाह, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्यासह संघाशी संबंधित संस्था असे एकूण २६६ पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >>> ब्रँण्डेड कपडे मागवले आणि हाती आल्या चिंध्या
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय समन्वय बैठक सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या प्रांगणात येत्या गुरुवार ते शनिवार (१४ ते १६ सप्टेंबर) या कालावधीत होणार आहे. संघातर्फे दरवर्षी परिवारातील संघटनांची समन्वय बैठक घेतली जाते. त्यानुसार यंदा ही बैठक पुण्यात होणार आहे. मुख्य बैठकीपूर्वी दोन दिवस आणि त्यानंतर दोन दिवसही विशेष बैठका होणार आहेत. त्यासाठी सर परशुरामभाऊ महाविद्यालयाचे सभागृह, मैदानाची व्यवस्था आणि निवास व्यवस्थेच्या कामांनी वेग घेतला आहे.
सरसंघचालक मोहन भागवत, सहकार्यवाह दत्तात्रय होसबाळे, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा बैठकीला उपस्थित राहणार आहेत. संघ परिवारातील मुख्य ३५ हून अधिक संस्थांच्या प्रतिनिधींची ही बैठक होणार असून प्रतिनिधी संघटनेचा कार्यअहवाल सादर करणार आहेत. त्यानंतर त्यावर सविस्तर चर्चा होऊन पुढील कार्याची दिशा आणि संघ परिवारातील संघटनांच्या समन्वयाची कार्यपद्धती निश्चित केली जाणार आहे.
हेही वाचा >>> सहा दिवसांसाठी दीड कोटी ‘पाण्यात’; पुणे महापालिकेचा अजब कारभार
अमित शहा गुरुवारी पुण्यात दरम्यान, हिंदी भाषा दिन आणि तिसऱ्या राजभाषा परिषदेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या गुरुवारी (१४ सप्टेंबर) पुण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमित शहा या महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. बैठकीसाठी येणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानाची आणि भोजनाची व्यवस्था स. प. महाविद्यालयाच्या आवारातच करण्यात आली आहे. घरगुती पद्धतीचे साधे जेवण त्यांच्यासाठी करण्यात येणार असून वाढपी व्यवस्थाही स्वयंसेवकांकडून केली जाणार आहे.