पिंपरी काँग्रेसकडून चिंचवड विधानसभेसाठी मोर्चेबांधणी; राष्ट्रवादीशी संघर्ष अटळ

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काँग्रेस पक्षातील राजीनामा नाटय़ संपल्यानंतर ‘पुनश्च हरी ओम’ करत पिंपरीचे शहराध्यक्ष सचिन साठे व त्यांच्या समर्थकांनी आगामी निवडणुकांसाठी तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी होईल, असे गृहीत धरून शहर काँग्रेसने राजकीय आडाखे निश्चित केले आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा, यासाठी काँग्रेसचे ठोस प्रयत्न असतील व त्यासाठी काँग्रेसला राष्ट्रवादीशी संघर्ष करावा लागेल, असे स्पष्ट संकेत आहेत.

पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी वाऱ्यावर सोडल्याचा आरोप करत सचिन साठे यांच्यासह शहर काँग्रेसच्या जवळपास सर्वच पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते. मात्र, दोन आठवडय़ांनंतर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा करत हे राजीनामे मागे घेण्यात आले. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून पक्षश्रेष्ठींनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बंडाची दखल घेतली. सर्व पदाधिकारी नव्या जोमाने पक्षाचे काम करतील, अशी ग्वाही काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी दिली. त्यानुसार काही दिवसांपासून काँग्रेस कार्यकर्ते कामाला लागले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहराचे कार्यक्षेत्र मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहे. दोन्हीही लोकसभा मतदारसंघ आघाडीच्या जागावाटपात राष्ट्रवादीला मिळतात. त्यामुळे शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकीत फारसे काम उरत नाही. चिंचवड, पिंपरी आणि भोसरी असे विधानसभेचे शहरातील तीन मतदारसंघ आहेत. त्या तीनही ठिकाणी काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत तीनही ठिकाणी काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता. काँग्रेसकडून जागावाटपात पिंपरी व चिंचवडची मागणी केली जात होती. आता ती मागणी केवळ चिंचवडपुरती राहिल्याचे दिसते. शहराध्यक्ष साठे यांचे कार्यक्षेत्र चिंचवड मतदारसंघात आहे, त्यामुळे त्यांच्याकडे काँग्रेसचे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जाते. राष्ट्रवादीतही चिंचवडसाठी इच्छुक असणाऱ्या दावेदारांची संख्या मोठी असल्याने राष्ट्रवादीकडून चिंचवडचा आग्रह कायम राहण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसच्या पदरात काय मिळणार, असा प्रश्न कार्यकर्त्यांना आतापासून पडला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Preparations for elections after resignations