पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन – एमएसआरडीसी) प्रस्तावित केलेल्या वर्तुळाकार रस्ता प्रकल्पासाठी भूसंपादनाची पूर्वतयारी वेगाने सुरू आहे. मावळ आणि मुळशी तालुक्यातील बाधित २६ गावांचे मूल्यांकन पूर्ण झाले आहे. तसेच भूसंपादनासाठी लवकरच स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. चालू वर्षात भूसंपादन पूर्ण करून प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू करण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्ते महामंडळाने १७२ किलोमीटर लांब आणि ११० मीटर रुंदीचा वर्तुळाकार रस्ता हाती घेतला आहे. या रस्त्याचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग करण्यात आले आहेत. पूर्व भागात मावळातील ११, खेडमधील १२, हवेलीतील १५, पुरंदरमधील पाच आणि भोरमधील तीन गावांचा समावेश आहे, तर पश्चिम भागात भोरमधील पाच, हवेलीतील ११, मुळशीतील १५ आणि मावळातील सहा गावांचा समावेश आहे. प्रकल्पासाठी ६९५ हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे. त्यानुसार जमिनींच्या मुल्यांकनाची प्रक्रिया पार पडली आहे.

हेही वाचा – पुणे : म्हाडाच्या घरांसाठी कागदपत्रे पडताळणी प्रक्रियेत बदल, जुने अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य

मावळ आणि मुळशी दोन्ही तालुक्यांतील २६ गावांत भूसंपादन करण्यात येणाऱ्या जमिनींचे मुल्याकंन निश्चित करण्यात आले आहे. हे मुल्यांकन निश्चित करताना जागा मालकांना विचारात घेऊन ते पूर्ण करण्यात आले आहे. तसेच, शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून भूसंपादन करण्यात येणाऱ्या प्रत्येक जमीननिहाय स्वतंत्र मुल्यांकन निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांतील भूसंपादन सुरू करण्याच्या दृष्टीने सर्व प्रक्रिया आता पूर्ण करण्यात आली असल्याचे प्रांत संदेश शिर्के यांनी सांगितले.

प्रकल्पासाठी २२ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून ११ हजार कोटी रुपये कर्ज देण्यास हुडकोने मान्यता दिली आहे. गरज पडल्यास हुडकोकडून वाढीव तरतुदीनुसार अधिक रकमेची मागणी करण्यात येणार आहे. त्यामुळे भूसंपादनापोटी द्यायच्या मोबदल्याचा प्रश्न यापूर्वीच मार्गी लागला आहे.

हेही वाचा – तुकड्यातील एक-दोन गुंठे जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारांची दस्त नोंदणी होणार का? निर्णय आठ दिवसांत

एप्रिलपासून प्रत्यक्ष काम सुरू

वर्तुळाकार रस्त्याच्या भूसंपादनासाठी विभागीय कार्यालयात स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात येणार आहे. या कक्षाच्या माध्यमातून लवकरच भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक ती यंत्रणा उभारण्यात आली आहे. येत्या मार्चपर्यंत भूसंपादनाचे काम पूर्ण करून निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येईल, असे रस्ते महामंडळाचे अधीक्षक अभियंता राहूल वसईकर यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Preparations for land acquisition for the ring road project in pune proposed by msrdc are in full swing pune print news psg 17 ssb