बेकायदेशीर बांधकामे नियमित करण्यासाठी नियमावली तयार करावी, अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तेरा नगरसेवकांनी राजीनामे दिले असले, तरी हे नगरसेवक महापालिकेतील विविध बैठकांना मात्र बुधवारी उपस्थित होते. त्यामुळे राजीनामे ही निव्वळ दिशाभूल असल्याचा विरोधकांच्या टीकेला पुष्टीच मिळाली आहे.
वडगाव शेरीचे आमदार बापू पठारे यांनी बेकायदा बांधकामांच्या प्रश्नावर राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या तेरा नगरसेवकांनी मंगळवारी त्यांचे राजीनामे सभागृहनेता सुभाष जगताप यांच्याकडे दिले. मात्र, आयुक्तांकडे राजीनामा दिल्यास पद आपोआप रद्द होते, अशी कायद्यातील तरतूद असल्यामुळे हे राजीनामे पक्षाकडे देण्यात आले आहेत. ही जनतेची निव्वळ दिशाभूल असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी राजीनाम्यानंतर लगेचच केला होता. तसेच पठारे राजीनामा दिल्यानंतरही विधासभेच्या कामकाजात उपस्थित राहात असल्यामुळे त्यांचाही दुटप्पीपणा सुरू असल्याची टीका करण्यात आली आहे.
या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादीचे राजीनामा दिलेले नगरसेवक बुधवारी महापालिकेतील बैठकांमध्ये उपस्थित होते. क्रीडा समितीचे अध्यक्षपद राष्ट्रवादीचे नगरसेवक अनिल टिंगरे यांच्याकडे असून समितीची बैठक बुधवारी त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. राष्ट्रवादीचे अन्य नगरसेवकही इतर बैठकांमध्ये उपस्थित होते. त्यामुळे विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला पुष्टीच मिळाली.
‘बीडीपी’साठीही राजीनामे
दरम्यान समाविष्ट तेवीस गावांमधील टेकडय़ांवर दर्शवण्यात आलेले जैववैविध्य उद्यानाचे (बायोडायव्हर्सिटी पार्क- बीडीपी) आरक्षण रद्द करावे, या मागणीसाठी गावांमधून निवडून आलेले राष्ट्रवादीचे नगरसेवकही राजीनामे देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, हे राजीनामेही पक्षाकडे द्यायचे का आयुक्तांकडे द्यायचे याबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Story img Loader