राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनावरील चित्रपटाचे जतन करण्यासाठी ‘पीआयक्यूएल’ हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला आहे. गांधी फिल्म फाउंडेशनतर्फे नाॅर्वे येथील पीआयक्यूएल तंत्रज्ञानाचा वापर करून ३५ एमएम फिल्म जतन करण्याचा हा भारतातील पहिलाच प्रयत्न असून याद्वारे चित्रपटाला किमान एक हजार वर्षांचे आयुष्य लाभणार आहे.
हेही वाचा >>> गांधीजींवर दोषारोप करून मोकळे होण्यापूर्वी…
गांधी फिल्म फाउंडेशनच्या मणिभवन येथील कार्यालयात झालेल्या एका विशेष कार्यक्रमात पीआयक्यूएलचे प्रतिनिधी रमेश बजाज यांनी या संग्रहित चित्रफिती गांधी फिल्म्स फाउंडेशनचे अध्यक्ष नितीन पोद्दार यांच्याकडे सुपूर्द केल्या. फाउंडेशनचे विश्वस्त उज्ज्वल निरगुडकर विश्वस्त, सुभाष जयकर या वेळी उपस्थित होते. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे हजार वर्षांहून अधिक काळ चित्रपटांचे जतन केले जाणार आहे. चित्रपटाच्या प्रिंट्सची दुसरी प्रत नॉर्वेमधील पीआयक्यूए च्या ‘आर्क्टिक वर्ल्ड आर्काइव्ह’मध्ये शून्य तापमानात जतन केली जाईल. उज्ज्वल निरगुडकर यांनी या योजनेची सुरुवात
केली असून सुभाष जयकर यांनी गांधींजींच्या जीवनावर आधारित दोन चित्रपट जतन करण्यासाठी निवडले. भारतातील पीआयएलक्यू चे मुख्य कार्यकारी अधिकारी रवीश मेहरा यांनी या प्रकल्पासाठी नॉर्वेशी समन्वय साधला. गांधीजींच्या जीवनाशी संबंधित दोन चित्रपट जतन केले गेले आहेत. पहिला चित्रपट १४ मिनिटांचा डॉक्युमेंटरी फिल्म स्वरूपातील आहे. यामध्ये लंडन येथील राउंड टेबल कॉन्फरन्स, लंडनमधील गोलमेज परिषद तसेच गांधींच्या स्वित्झर्लंड आणि इटलीच्या भेटींचा समावेश आहे. तर, दुसरा चित्रपट १२ मार्च १९३० रोजी गुजरातमधील नौखली येथे झालेल्या मिठाच्या आंदोलनाविषयीचा असून तो अकरा मिनिटांचा आहे.
हेही वाचा >>> Indian Currency Note: नोटांवर आधी गांधीजींचा फोटो नव्हताच; वाचा नेमका काय आहे भारतीय चलनाचा इतिहास! कशा छापल्या जातात नोटा!
गांधीजींच्या जीवनावरील या चित्रफिती मौल्यवान असून आपल्या भावी पिढ्यांसाठी त्यांचे जतन करणे आवश्यक आहे. हे जतन केले नसते तर आपण अमूल्य राष्ट्रीय संपत्तीला मुकलो असतो. – नितीन पोद्दार, अध्यक्ष, गांधी फिल्म्स फाउंडेशन