लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : राज्यातील शिवकालीन घराण्यांकडे असलेल्या ऐतिहासिक वास्तू, शस्त्रे, दस्तावेजांचे जतन आणि संवर्धन करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने पुरातत्व विभागाच्या संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली आहे.
पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने या बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. महाराष्ट्र आणि स्वराज्य घडवण्यात सिंहाचा वाटा असलेल्या शिवकालीन घराण्यांच्या ऐतिहासिक वास्तू, शस्त्रे, दस्तावेजांचे संकलन संवर्धन करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले होते. त्यानुसार समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीमध्ये शिवकालीन घराण्यांचे वारसदार असलेल्या इंद्रजित जेधे, अनिकेत बांदल, श्रीनिवास इंदलकर, ऋषिकेश नाईक निंबाळकर, नीलकंठ बावडेकर, रवींद्र कंक, अभयराज शिरोळे, रामदास सणस, गोखल करंजावणे, सचिन भोसले यांच्यासह समीर वारेकर, पांडुरंग ताठेले यांचा समावेश आहे.
आणखी वाचा-महाराष्ट्राचे मॉडेल नेणार देशपातळीवर, पुढील वर्षीपासून सात नवे अभ्यासक्रम
सरदार घराण्यांसंबंधी ऐतिहासिक वास्तू, मौल्यवान पुरावस्तू, पुरावशेष यांची यादी आणि दस्तावेजीकरण करण्यासाठी मार्गदर्शन, संबंधित समकालीन दस्तावेजांचे, कागदपत्रांचे डिजिटायझेशन आणि जतन-संवर्धनासाठी सहाय्य, वास्तूंचे सार्वजनिक खासगी पद्धतीने जतन-संवर्धन कार्याचा आणि पर्यटन वृद्धीचा आराखडा तयार करणे, सरदार घराण्यांसंबंधी ऐतिहासिक वास्तू आणि कागदपत्रांचे संग्रहालय म्हणून एकत्रित विकास करण्यासाठी सहकार्य करणे अशी समितीची कार्यकक्षा निश्चित करण्यात आली आहे.