पुणे : दुर्मीळ पुस्तकांचे डिजिटायझेशनच्या माध्यमातून जतन करण्याच्या ‘पुणे नगर वाचन मंदिर’ संस्थेच्या प्रकल्पाद्वारे एक हजाराहून अधिक पुस्तके ऑनलाईन माध्यमातून ठेवण्यात आली असून, त्याचा साहित्यप्रेमींना विनाशुल्क लाभ मिळत आहे. ‘लोकसत्ता’च्या ‘सर्व कार्येषु सर्वदा’ उपक्रमातून मिळालेल्या निधीतून संस्थेने सुरू केलेल्या दुर्मीळ पुस्तकांच्या जतन करण्याच्या प्रकल्पाला गती आली असून, पाचशेहून अधिक साहित्यप्रेमी वाचकांनी त्यांच्या आवडीची आणि अभ्यासाची दुर्मीळ पुस्तके ‘पेन ड्राईव्ह’मध्ये घरी नेली आहेत.
लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी ८ फेब्रुवारी १८४८ रोजी स्थापन केलेली पुणे नगर वाचन मंदिर ही संस्था शुक्रवारी १७८ व्या वर्षांत पदार्पण करीत आहेत. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे संस्थेचे पहिले अध्यक्ष होते. लोकहितवादी यांच्याकडून प्रेरणा घेत स्थापनेच्या शतकोत्तर अमृतमहोत्सवानंतर संस्थेने आपल्याकडील दुर्मीळ ज्ञानभांडार सर्वसामान्यांसाठी खुले करून देण्याचा निर्णय घेत लोकहिताचे काम केले आहे. वर्धापनदिनानिमित्त संस्थेमध्ये शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात विविध पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती पुणे नगर वाचन मंदिराचे अध्यक्ष मधुमिलिंद मेहेंदळे यांनी दिली.
‘लोकसत्ता’च्या ‘सर्व कार्येषु सर्वदा’ उपक्रमातून मिळालेल्या निधीतून संस्थेने राबविलेल्या दुर्मीळ पुस्तकांच्या डिजिटायझेशन प्रकल्पाला गती मिळाली. आतापर्यंत एक हजाराहून अधिक पुस्तके स्कॅन करून ‘विकिपीडिया कॉमन्स’वर आणि संस्थेच्या संकेतस्थळावर ठेवण्यात आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने साठ वर्षांपूर्वीची आणि जी सध्या उपलब्ध होत नाहीत, अशा पुस्तकांचा समावेश आहे. संस्थेच्या संग्रहातील पुस्तकांबरोबरच भोर, वाई, हैदराबाद, माथेरान, पुणे मराठी ग्रंथालय आणि स. प. महाविद्यालयाचे ग्रंथालय येथूनही काही पुस्तके मिळवून ती जतन करण्यात आली आहेत. पुणे नगर वाचन मंदिरामध्ये एक संगणक ठेवण्यात आला आहे. त्या माध्यमातून वाचक संकेतस्थळ उघडून जतन करण्यात आलेल्या पुस्तकांपैकी त्यांच्या आवडीचे आणि अभ्यासाचे पुस्तक ‘पेन ड्राईव्ह’च्या माध्यमातून डाऊनलोड करून घरी घेऊन जाऊ शकतात. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. आतापर्यंत पाचशेहून अधिक साहित्यप्रेमी, अभ्यासक आणि सामान्य वाचकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे, असे मेहेंदळे यांनी सांगितले.
परदेशातील मुलांना मराठी शिकण्यासाठी व्हिडीओ
उद्योग आणि व्यवसायानिमित्त परदेशी स्थायिक झालेल्या मराठीजनांच्या पुढील पिढीला मराठी शिकण्यासाठी आणि भाषेची गोडी लागावी या उद्देशातून पुणे नगर वाचन मंदिराने ज्ञान प्रबोधिनीच्या सहकार्याने व्हिडीओची निर्मिती केली आहे. कोणत्या भाजीला इंग्रजीमध्ये काय म्हणतात आणि मराठीमध्ये त्याचा उच्चार कसा करायचा याची माहिती देणारे तसेच दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारे मराठी शब्द यांची माहिती या पाच मिनिटांच्या चित्रीकरणातून देण्यात आली आहे. अशा स्वरूपाचे १५ व्हिडीओ करण्यात आले असून, वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात शुक्रवारी (८ फेब्रुवारी) त्याचे औपचारिक उद्घाटन होणार आहे, असे मधुमिलिंद मेहेंदळे यांनी सांगितले.