शहराच्या विकास आराखडय़ात बिल्डरच्या लाभासाठी अनेक जमिनी निवासी करण्यावरच महापालिका प्रशासन थांबलेले नाही, तर पाषाण, सुतारवाडी या विभागातील एचईएमआरएल या संरक्षण खात्याच्या संशोधन प्रयोगशाळेशेजारचे संरक्षित क्षेत्रही निवासी करण्याचा उद्योग प्रशासनाने केला आहे. संरक्षित क्षेत्राच्या हद्दीत परस्पर बदल करणारा नकाशाही महापालिकेने प्रसिद्ध केला आहे.
विकास आराखडय़ाचे जे नकाशे प्रकाशित करण्यात आले आहेत, त्यात पाषाण, सुतारवाडी या विभागात एचईएमआरएलचे (हाय एनर्जी मटेरियल रिसर्च लॅबोरेटरी) क्षेत्र दर्शवण्यात आले आहे. या संस्थेकडील क्षेत्राचा नकाशा केंद्र शासनाने सन २००२ मध्ये राजपत्रात प्रकाशित केला असून संरक्षण खात्याच्या दृष्टीने ही संस्था महत्त्वपूर्ण असल्यामुळे या संस्थेच्या परिसरात चारही बाजूंना पाचशे मीटपर्यंतचे क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून राजपत्रात दर्शवण्यात आले आहे. सुमारे दोनशे एकर डोंगरमाथा/डोंगरउताराचे हे संरक्षित क्षेत्र असून संस्थेच्या मिळकतीलगत निवासी स्वरूपाची बांधकामे होऊ नयेत हा त्यामागील उद्देश आहे. मात्र, शहराच्या विकास आराखडय़ात हे संरक्षित क्षेत्रही निवासी करण्यात आल्याची तक्रार पुणे बचाव समितीने केली आहे. समितीचे उज्ज्वल केसकर आणि शिवा मंत्री यांनी शनिवारी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली.
एचईएमआरएल संस्थेचे व संस्थेच्या परिसरातील प्रतिबंधित/संरक्षित क्षेत्र आराखडय़ात दर्शवण्याऐवजी ते निवासी करण्यामागचे कारण काय असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. या भागात झालेली काही बांधकामे त्यामुळे कायदेशीर होणार आहेत आणि नव्याने बांधकामे करण्यासाठी फार मोठी जमीन उपलब्ध होणार आहे. या भागातील बंगलेधारकांना संरक्षण देण्याचाच हा प्रकार आहे, असाही आरोप समितीने केला आहे.
निवासीकरणाचा नकाशाही समितीने तक्रारीबरोबर दिला असून या नकाशाबाबत नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांना विचारले असता ते म्हणाले, की आलेल्या तक्रारीनुसार आराखडय़ाचा नकाशा तपासून पाहावा लागेल. कदाचित, तो भाग हद्दीबाहेरचा असू शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा