‘मेरा तिरंगा मेरा अभिमान’ या अभियानातून स्वातंत्र्यदिनाच्या दुसऱ्या दिवशी अनेक ठिकाणी रस्त्यावर इतरत्र पडलेले ध्वज संकलित करत पुण्यातील ’कीर्तने अँड पंडित फर्म’ने मंगळवारी तिरंग्याचा अभिमान जपला.
कर्वे रस्ता, पौड रस्ता, डेक्कन जिमखाना, फर्ग्युसन रस्ता यासह शहराच्या विविध भागात मंगळवारी सकाळी ध्वज संकलन अभियान राबविण्यात आले. ‘कीर्तने अँड पंडित’चे भागीदार मिलिंद लिमये यांच्या नेतृत्वाखाली सनदी लेखापाल आणि आर्टिकलशिप करणारे विद्यार्थी अशा शंभर जणांनी यामध्ये सहभाग घेतला. ‘आयसीएआय’च्या विभागीय समिती सदस्य ऋता चितळे, मौसमी शहा, शशांक पत्की, ‘कीर्तने अँड पंडित’चे भागीदार श्रीपाद कुलकर्णी, प्रल्हाद मानधना, तन्मय बोधे आणि आनंद जोग या वेळी उपस्थित होते.
लिमये म्हणाले, प्रत्येक भारतीयांचा अभिमान असलेल्या तिरंगा ध्वजाचा उचित सन्मान व्हावा, या हेतूने ’मेरा तिरंगा मेरा अभिमान’ हे विशेष ध्वज संकलन अभियान राबविले. माझ्या सहकाऱ्यांनी शहराच्या विविध भागात फिरून संकलित केलेले हे सर्व ध्वज सन्मानपूर्वक भारत फ्लॅग फाउंडेशनकडे सुपूर्द केले जाणार आहेत.