पुणे : विविध क्षेत्रात मुली प्रगती करत आहेत. नारीशक्तीचा विचार देशवासियांसाठी अभिमानाची बाब आहे. देशाच्या विकासाचा तो महत्त्वपूर्ण मापदंड आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या २१व्या पदवी प्रदान कार्यक्रमात मुर्मू बोलत होत्या. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, राज्याचे उच्च न तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मजुमदार, प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू प्रा. रमण रामकृष्णन या वेळी उपस्थित होते. मुर्मू यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी, सुवर्णपदके प्रदान करण्यात आली.

सुवर्णपदक मिळवलेल्या विद्यार्थ्यांमध्ये आठ मुलींचा समावेश असल्याचा मुर्मू यांनी आनंद व्यक्त केला. विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्या म्हणाल्या, की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०मध्ये संशोधनावर भर देण्यात आला आहे. शिक्षण प्रणालीमध्ये संशोधनाला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. देशातील संशोधक केवळ भारतातीलच नाही, तर जगातील समस्यांवर उपाय शोधण्यास सक्षम आहेत. देशाच्या विकासासाठी युवा पिढी प्रयत्नपूर्वक कार्यरत असल्याचा माझा विश्वास आहे. देशातील तरुणांकडे गुणवत्ता आणि कौशल्य आहे. समाजाच्या गरजा ओळखून सॉफ्टवेअर, आरोग्य साधने विकसित करावीत. विशेषतः वंचित घटकांसाठी ती उपयुक्त ठरतील. त्यातून शाश्वततेला प्रोत्साहन मिळेल. सरकारच्या स्टार्टअप इंडिया, स्कील इंडिया, मेक इन इंडिया अशा योजनांतून युवा पिढी त्यांची उद्दिष्ट्ये साकार करू शकेल.

हेही वाचा : पुणे: अग्निशमन दलाच्या जवानाची तत्परता, कामावर जात असताना दुचाकीला लागलेली आग आटोक्यात

नव्या पिढीला तंत्रज्ञानाचे धडे देतानाच मूल्याधारित शिक्षण देण्याचीही गरज आहे. केवळ आपल्या कुटुंबाचा विचार न करता साऱ्या विश्वाचा विचार करून पुढे गेले पाहिजे. समाजशास्त्र आणि अन्य क्षेत्रांमध्ये नावीन्यता, कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंगच्या माध्यमातून प्रभावी योगदान देणे शक्य आहे, असे मुर्मू यांनी सांगितले.