पिंपरी : विविध वाहिन्यांवर प्रसारित होत असलेल्या कीर्तन सोहळ्यात वारकरी सांप्रदायिक आचारसंहिता पाळली जात नाही. साधू, संतांनी परमार्थिक प्रबोधनासाठी सुरू केलेल्या कीर्तन परंपरेच्या विद्रुपीकरणाचे पाप करू नये, असे आवाहन देहूतील जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थांनच्या वतीने राज्यभरातील कीर्तनकारांना करण्यात आले आहे.
राज्यभरात विविध ठिकाणी सप्ताह, देव देवता, महापुरूष, पुण्यतिथी, जयंतीनिमित्त कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. सध्या वारकरी कीर्तनाचे कार्यक्रम विविध मराठी वृत्तवाहिन्यांवर प्रसारित होत आहेत. यामध्ये काही ठिकाणी कीर्तन सादर होताना वारकरी सांप्रदायिक आचारसंहिता पाळली जात नाही. कीर्तन करण्याची चौकट सांभाळली जात नाही, असे दिसून येते. हे खूप गंभीर आहे. साधू-संतांनी परमार्थिक प्रबोधनासाठी सुरू केलेल्या कीर्तन परंपरेचे विद्रुपीकरणाचे पाप वृत्तवाहिन्या, निर्माते, कीर्तनकार यांनी करू नये, आवाहन संस्थांनने जाहीर निवेदनाद्वारे केले आहे.
हेही वाचा : तुकाराम महाराजांवर वादग्रस्त वक्तव्य केल्याची चूक लक्षात आली का? धीरेंद्र शास्त्री म्हणाले…
संस्थांनचे अध्यक्ष पुरूषोत्तम महाराज मोरे म्हणाले की, कीर्तनात अतिरेक होत आहे. नियमांचे पालन केले जात नाही. संत, साहित्य मोठे साहित्य आहे. त्यातील पुराण-वेद कीर्तनात सांगितले जात नाहीत. श्री संत तुकाराम महाराज, श्री संत ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, नामदेव महाराज यांनी सुंदर लिखाण केले आहे. तेही कीर्तनात सांगितले जात नाही. कीर्तन मनोरंजनाचे साधन नाही. कीर्तन करण्याची चौकट सांभाळली पाहिजे.