पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पोलीस दलातील उल्लेखनीय सेवेबद्दल राज्य गुप्त वार्ता विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डाॅ. राजेंद्र डहाळे, तसेच पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांना राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर झाले. पुणे ग्रामीण पोलीस दलातील पाच अधिकाऱ्यांना नक्षलग्रस्त भागात केलेल्या कामगिरीबद्दल विशेष सेवा पदक जाहीर करण्यात आले, तसेच ग्रामीण पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतींचे पदक जाहीर करण्यात आले. राज्य कारागृह विभागातील ५ अधिकारी राष्ट्रपती पदकाचे मानकरी ठरले आहेत

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नंदुरबार येथे २०१७ मध्ये डहाळे पोलीस अधीक्षक होते. त्यावेळी त्यांना राष्ट्रपतींचे पदक जाहीर झाले होते. डाॅ. डहाळे दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदकाचे मानकरी ठरले आहेत. डहाळे पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेत उपायुक्त होते. डहाळे यांच्या कार्यकाळात सायबर फाॅरेन्सिक लॅबची स्थापना करण्यात आली होती. अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी पुण्यात काम केले होते. राज्य गुन्हे अन्वेषण विभागात (सीआयडी) ते नियुक्तीस होते. शांत, मितभाषी असललेल्या डहाळे यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस महासंचालकांचे सन्मान चिन्ह मिळाले होते.

हेही वाचा >>>केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्याच्या पुण्यातच प्रवाशांची ‘वाऱ्यावरची वरात’!

सतीश गोवेकर १९८८ मध्ये पोलीस दलात रूजू झाले. पोलीस उपनिरीक्षक म्हणून त्यांनी पुण्यात काम केले. अनेक गंभीर गु्न्ह्यांचा छडा गोवेकर यांनी लावला. २००७ मध्ये त्यांना पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती मिळाली. २०१७ मध्ये ते सहायक पोलीस आयुक्त झाले. फरासखाना विभागात ते सहायक आयुक्त होते. त्यानंतर त्यांची गुन्हे शाखेत नियुक्ती करण्यात आली. मुंबई शहर, नवी मुंबई, नागपूर ग्रामीण, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे शहरात त्यांनी सेवा बजावली.

पुणे ग्रामीण पोलीस दलातील सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शंकर वाघमारे, अनिल उत्तम काळे यांना राष्ट्रपतींचे पदक जाहीर करण्यात आले. नक्षलग्रस्त भागात केलेल्या कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक वैशाली रावसाहेब पाटील, सचिन दत्तात्रय वांगडे, दिनेश सखाराम तायडे, सुभाष सदाशिव चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक जिनेश मुकुंद कोळी यांना विशेष पदक जाहीर करण्यात आले आहे.

हेही वाचा >>>‘राष्ट्रवादी’ची जन सन्मान यात्रा उद्या अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यात

उल्लेखनीय सेवेबद्दल येरवडा कारागृहातील दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन वालचंद्र वायचळ , ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे तुरुंग अधिकारी शिवाजी पांडुरंग शिंदे, मुंबई मध्यवर्ती कारागृहाचे सुभेदार दीपक सूर्याजी सावंत, मुंबई मध्यवर्ती कारागृहाचे हवालदार जनार्धन गोविंद वाघ यांना राष्ट्रपदी पदक जाहीर करण्यात आले आहे. कारागृह विभागात वैशिष्टपूर्ण सेवेबाबत मुंबई मध्यवर्ती कारागृहाचे हवालदार अशोक बुवाजी ओळंबा यांना राष्ट्रपदी पदक जाहीर करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: President police medal to rajendra dadale satish govekar for meritorious service pune print news rbk 25 amy