राष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक होत असून, यासाठी मतदान सुरू आहे. भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या द्रौपदी मुर्मू आणि विरोधकांचे संयुक्त उमेदवार माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्यात थेट लढत दिसत आहे. या निवडणुकीबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी आज पुण्यात माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

“राष्ट्रपतीपदाची निवडणूक मोठी चुरशीची होणार आहे. या अशा निवडणुकीमध्ये अंदाज लागत नाही. पण सर्वसाधारणतः ज्या पक्षाचे बहुमत असते, त्या पक्षाकडून आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न असतो आणि तेच होतं. पण आताची थोडीशी परिस्थिती वेगळी दिसत आहे, त्यामुळे काय होईल सांगता येत नाही.” असं सुशील कुमार शिंदे यांनी सांगितलं आहे.

तसेच, सध्या राज्यात जी राजकीय परिस्थिती आहे आणि नवीन सरकार आलेलं आहे, यावर प्रतिक्रिया देताना शिंदे यांनी “सध्या आम्ही वॉच करीत आहोत.” असं म्हणत फार बोलणं टाळलं.

Presidential Election 2022 Live: काँग्रेस आमदाराचं द्रौपदी मुर्मू यांना मतदान? वक्तव्यामुळे चर्चांना उधाण

याशिवाय, सोलापूर भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख विरोधात एका महिलेवर लैंगिक अत्याचार प्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यावर सुशील कुमार शिंदे यांनी, “ त्यांना लाज वाटली पाहिजे”, असं म्हणत प्रतिक्रिया दिली.

तर, द्रौपदी मुर्मू यांना ६० टक्क्यांपेक्षा अधिक मतदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे त्यांच्या विजयाची औपचारिकता उरली असल्याचं सांगितलं जात आहे. देशाच्या दुसऱ्या महिला आणि आदिवासी समाजाच्या पहिल्या नेत्या येत्या २५ जुलै रोजी सर्वोच्च पदावर विराजमान होतील असा विश्वास सत्ताधारी पक्षाला आहे.

Story img Loader