बदलत्या काळात पाश्चात्त्य संस्कृतीचे आचरण वाढत आहे. ही आपल्या देशाची संस्कृती आहे का? आपण केवढा मोठा वारसा आणि परंपरा घेऊन जन्माला आलो आहोत याची मुलांना जाण नाही. त्यांच्यामध्ये आपल्या संस्कृतीविषयी अभिमान जागवायचा असेल तर, त्याचे धडे शालेय जीवनापासूनच द्यायला हवेत. ही जबाबदारी सरकार, कलाकार आणि पालकांची आहे, असे मत ज्येष्ठ संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांनी शनिवारी व्यक्त केले.
भारती विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी सांगतेनिमित्त पौड रस्त्यावरील शैक्षणिक संकुल येथे रविवारी (३ मे) सायंकाळी साडेपाच वाजता स्वरस्पंदन मैफल होणार आहे. याअंतर्गत पं. शिवकुमार शर्मा यांचे संतूरवादन आणि पं. राजन-साजन मिश्रा यांचे गायन होणार आहे. त्यानिमित्ताने या कलाकारांनी पत्रकारांशी संवाद साधला. स्कूल ऑफ परफॉर्मिग आर्टस्च्या सल्लागार समितीवर हे दिग्गज कलाकार काम करणार असल्याची माहिती शारंगधर साठे यांनी या वेळी दिली.
पं. शर्मा म्हणाले,‘‘ शाळांमध्ये अन्य विषयांप्रमाणे संगीत हा विषयदेखील सक्तीचा करावा. सध्याच्या शिक्षण पद्धतीतील विषय मुलांवर ओझे लादतात. त्यातून बाहेर पडून संगीत हा मन एकाग्र करणारा आणि ताजेतवाने करणारा विषय आहे. त्यामुळे मुलांची क्षमता वाढू शकेल. ज्यांना रस आहे ते संगीत शिक्षण घेतील आणि ज्यांना रस नाही ते किमान कानसेन तरी होतील. आपल्या कलाकाराला परदेशात पुरस्कार मिळाल्यानंतर तो चांगला असल्याची जाण लोकांना येते. मात्र, परदेशी कलाकारांना भारतामध्ये पुरस्कार मिळणे गौरवाचे व्हावे आणि त्यांनी ते डोक्यावर घ्यावे यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.’’
पं. राजन मिश्रा म्हणाले,‘‘शास्त्रीय संगीत आणि सांस्कृतिक परिस्थिती सुधारण्यासाठी आपण काय करीत आहोत हा प्रश्न स्वत:ला विचारायला हवा. शास्त्रीय संगीताविषयीचे गैरसमज दूर करणे आवश्यक आहे. आपण इतिहास आचरणात आणत नाही. संगीताची ध्वनिमुद्रणे ऐकण्यामध्ये मुलांना रुची दिसत नाही.’’
पं. साजन मिश्रा म्हणाले,‘‘मुलांना तुम्ही जे द्याल त्याकडे ते आकर्षित होतात. त्यामुळे पालकांची जबाबदारी मोठी आहे. सध्या मुलांच्या कानावर पडणारे संगीत संस्कृतीला घातक असून त्यावर पालकांचा अंकुश असणे गरजेचे आहे.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा