शाळांना उन्हाळ्याच्या सुट्टय़ा लागल्या असल्याने अनेकांनी विविध ठिकाणी जाण्याचे नियोजन सुरू केले असल्याने खासगी प्रवासी बसचालकांकडून प्रवासी भाडय़ामध्ये वाढ केली आहे. मागणी असलेल्या मार्गावर नेहमीच्या भाडय़ापेक्षा सुमारे २० ते ३० टक्क्य़ांची वाढ करण्यात आली आहे. खासगी प्रवासी बसच्या भाडय़ाबाबत कुठलेही नियंत्रण नसल्याने गरजू प्रवाशांना मुकाटय़ाने ही दरवाढ द्यावी लागत आहे.
मुलांच्या शाळेला उन्हाळी सुट्टय़ा लागल्यानंतर शहरात नोकरी धंद्याच्या निमित्ताने स्थायिक झालेले अनेकजण काही दिवस मूळ गावी जाण्याचे नियोजन करतात. त्याचप्रमाणे याच काळावधीत प्रामुख्याने विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. त्याचप्रमाणे बहुतेक कौटुंबिक सहलींचेही याच कालावधीत आयोजन करण्यात येते. त्यामुळे सुट्टय़ांच्या कालावधीत सर्वच मार्गावरील गाडय़ांना मोठय़ा प्रमाणावर गर्दी असते. एसटी किंवा रेल्वेच्या वतीने या कालावधीत जादा गाडय़ा सोडल्या जातात. मात्र, प्रवाशांची मोठय़ा प्रमाणावरील संख्या लक्षात घेता खासगी प्रवासी वाहतुकीलाही मोठय़ा प्रमाणावर प्रतिसाद मिळतो. खासगी प्रवासी वाहतुकीतील सुमारे ३०० बस दररोज राज्याच्या व देशाच्या विविध भागांत जातात.
कोणत्याही कालावधीत एसटी किंवा रेल्वेचे भाडे सारखेच असते. मात्र, प्रवाशांची गरज व मागणी लक्षात घेता दरवर्षी सुट्टीच्या कालावधीत खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून नेहमीच्या तुलनेत जादा भाडय़ाची आकारणी केली जाते. यंदाही उन्हाळी सुट्टी लागताच बहुतांश वाहतूकदारांनी भाडेवाढ लागू केली आहे. नागपूर, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, जळगाव, धुळे या सर्वाधिक मागणी असलेल्या मार्गावर शंभर ते दिडशे रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. लातूर, नांदेड, उस्मानाबाद, उमरगा, सोलापूर, औरंगाबाद, कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, कोकण आदी भागांतील मार्गावर पन्नास ते शंभर रुपयांची वाढ झालेली आहे.
सध्या ही भाडेवाढ झाली असली, तरी काही दिवसांमध्ये प्रवाशांची संख्या वाढल्यास त्यात आणखी वाढ होत जाणार असल्याचे बोलले जाते. त्याचा भरुदड प्रवाशांना बसणार आहे. त्यामुळे खासगी बसच्या भाडय़ावरही नियंत्रण असले पाहिजे, अशी मागणी केली जात आहे.