लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे: अन्न प्रक्रिया, बेकरी, मसाला या पारंपरिक उद्योगांसह वाइन, बिअर, आणि आयुर्वेदिक क्षेत्रातून ओव्याला मागणी वाढली आहे. निर्यातीलाही मोठा वाव असल्यामुळे सरासरी दहा हजार रुपये प्रति क्विंटल असणारा ओवा यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच अकरा हजार रुपयांवर गेला आहे. दरातील तेजीचा फायदा विदर्भ, खानदेश आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना होणार आहे.

वाइन, बिअर उद्योगात मुळातील चव बदलण्यासाठी आणि नवी चव निर्माण करण्यासाठी, तुरटपणा कमी करण्यासाठी ओवा वापरला जातो. पण, व्यावसायिक गणिते जपण्यासाठी बिअर, वाइन उद्योगात ओव्याचा वापर किती प्रमाणात आणि कोणत्या पातळीवर, कोणत्या पद्धतीने केला जातो. याची कृती गोपनीय ठेवली जाते. त्यामुळे उद्योगातील ओव्याच्या वापराविषयी ठोस माहिती मिळत नाही. मात्र, उद्योगातील ओव्याच्या वापरावर मात्र, तज्ज्ञांचे एकमत आहे.

आणखी वाचा- पुणे रेल्वे स्थानकात तपासणीच्या नावाखाली लोहमार्ग पोलिसच करत होते प्रवाशांची लूटमार; सहा पोलीस निलंबित

प्रामुख्याने राजस्थान, गुजरातच्या दुष्काळी पट्ट्यात होणारा ओवा आता राज्यातील दुष्काळी, कमी पाण्याच्या आणि खारपाण पट्ट्यात होऊ लागला आहे. विदर्भातील विशेषकरून अकोला, वाशिम, बुलडाणा खानदेशातील काही जिल्हे मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, नांदेड जिल्ह्यातील काही भागात ओवा नगदी पीक म्हणून समोर येऊ लागले आहे. राज्यात सुमारे सहा हजार हेक्टर क्षेत्रावर ओव्याचे पीक घेतले जात आहे. आजवर कापूस न उगविलेल्या जागेत, किंवा शेताच्या एखाद्या कोपऱ्यात ओवा टाकला जायचा. पण, कमी पाण्यात, कमी उत्पादन खर्चात चांगले उत्पादन आणि चांगला दर मिळू लागल्यानंतर शेतकरी ओव्याची सलग शेती करू लागले आहेत. तुटवड्याच्या काळात ओव्याचा दर पंधरा हजार रुपयांपर्यंत गेलेला आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील मिरची आणि भाजीपाला संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. एस. एम. घावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओवा साडेचार महिन्यात काढणीला येणारे पीक असल्यामुळे कापूस न उगविलेल्या ठिकाणी ओवा टाकला जायचा. पाणी न देता जमिनीतील ओलावा आणि पावसाच्या पाण्यावर ओवा पीक घेतले जायचे. मात्र, संशोधन केंद्राच्या वतीने आजमेर येथील राष्ट्रीय मसाले बियाणे संशोधन केंद्राच्या मदतीने राज्यात ए-०१-१९ हे वाणाचे उत्पादन घेण्यास सुरूवात झाली. प्रति एकर सरासरी पाच क्विंटल उत्पादन निघू लागले. एकरी उत्पादन खर्च जेमतेम पाच हजारांच्या घरात असल्यामुळे शेतकऱ्यांनी ओवा पिकाला प्राधान्य दिले. त्याचा परिणाम म्हणून राज्यात सहा हजार हेक्टरवर ओवा पिकाची लागवड केली जात आहे. काही शेतकरी कापसापेक्षा जास्त उत्पादन देणारे पीक म्हणूनही ओव्याची लागवड करतात.

आणखी वाचा- पुणे: सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यातील लाचखोर पोलीस उपनिरीक्षक गजाआड

ओव्याचा वापर वाढला

देशातील बेकरी, वाइन, बिअर, मसाला, अन्न प्रक्रिया व आयुर्वेदिक क्षेत्रासह जगभरातून भारतीय ओव्याला मागणी वाढली आहे. विशेषकरून बिअर उद्योगातूनही अलिकडे ओव्याचा वापर वाढल्याचे सांगितले जात आहे. चीन, भारत जर्मनी, इजिप्त, स्पेन, पोलंड, कॅनडा, फ्रान्स ओव्याचे प्रमुख उत्पादक आणि निर्यातदार आहेत. देशात ओवा लागवडी खालील एकूण क्षेत्र सुमारे २५.००० हेक्टर आहे, तर एकूण उत्पादन २० हजार टनांच्या घरात आहे.

मसाला, अन्न प्रक्रिया या पारंपरिक उद्योगांसह जंकफूड, बिअर, वाइन उद्योगातून ओव्याला मागणी वाढली आहे. प्रामुख्याने दुष्काळी पट्ट्यात, कमी पाण्यात, कमी खर्चात येणारे पीक असल्यामुळे राज्यातील क्षेत्र सहा हजार हेक्टरवर गेले आहे. अकोला, वाशिम, औरंगाबाद येथे बाजारपेठ विकसीत झाल्यामुळे सरासरी दहा हजार प्रति क्विंटलचा दर मिळतो आहे. -डॉ. एस. एम. घावडे, प्रमुख, मिरची आणि भाजीपाला संशोधन केंद्र, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Price of ajwaine is increase because of wine and beer industry pune print news dbj 20 mrj