पुणे : संक्रातीनंतर फळभाज्यांना मागणी कमी झाली असून, घाऊक बाजारात टोमॅटो, काकडी, पापटी, कोबी, शेवगा, ढोबळी मिरची, वालवर, घेवडा, मटार या फळभाज्यांच्या दरात १० ते २० टक्क्यांनी घट झाली. आवक कमी झाल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या दरात वाढ झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी राज्य, तसेच परराज्यातून मिळून १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. गेल्या आठवड्यात संक्रात होती. संक्रातीला भाज्यांची मोठी आवक बाजारात झाली होती. संक्रातीनंतर फळभाज्यांना अपेक्षित मागणी नसल्याने दरात घट झाल्याची माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली. कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशातून मिळून ८ ते १० टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक, गुजरातमधून मिळून प्रत्येकी ४ ते ५ टेम्पो कोबी, कर्नाटकातून घेवडा आणि पावटा प्रत्येकी ५ ते ६ टेम्पो, आंध्र प्रदेश, तमिळनाडूतून मिळून ५ ते ६ टेम्पो शेवगा, राजस्थानातून १४ ते १५ टेम्पो गाजर, मध्य प्रदेशातून १८ ते २० ट्रक मटार, तमिळनाडूतून १ टेम्पो तोतापुरी कैरी, मध्य प्रदेशातून ८ ते १० टेम्पो लसूण अशी आवक परराज्यातून झाली.
हेही वाचा >>>पुणे: घरफोडीच्या गुन्ह्यात तीन वर्ष गुंगारा देणारा चोरटा अटकेत
पुणे विभागातून सातारी आले ५०० ते ६०० गोणी, भेंडी ७ ते ८ टेम्पो, गवार ४ ते ५ टेम्पो, टोमॅटो १० ते १२ हजार पेटी, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, काकडी ८ ते १० टेम्पो, कोबी ४ ते ५ टेम्पो, फ्लाॅवर १० ते १२ टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, कांदा ७० ते ७५ ट्रक, तसेच इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून ४० ते ४५ टेम्पो बटाट्याची आवक झाली.
पालेभाज्यांच्या दरात घट
बहुतांश पालेभाज्यांच्या दरात घट झाली. कोथिंबिर, मेथी, कांदापात, करडई, पुदिना, राजगिरा, चुका, पालक, अंबाडी, मुळे, राजगिरा, चवळई, पालक आणि हरभरा गड्डीच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली. तरकारी विभागात कोथिंबीर एक लाख २५ हजार जुडी, मेथीच्या ७० हजार जुडी, तसेच हरभरा गड्डीची १५ ते २० हजार जुडीची आवक झाली. घाऊक बाजारात पालेभाज्यांचे शेकड्याचे दर पुढीलप्रमाणे – कोथिंबीर- ५०० ते १०००, मेथी -७०० ते १०००, शेपू – ५०० ते ८००, कांदापात- ५०० ते १०००, चाकवत – ३०० ते ७००, करडई- ३०० ते ७००, पुदिना – ३०० ते ६००, अंबाडी – ४०० ते ६००, मुळे – ८०० ते १०००, राजगिरा- ४०० ते ६००, चुका – ५०० ते ८००, चवळई- ८००-१०००, पालक- ८००-१०००. हरभरा गड्डी – ५०० ते १०००
कलिंगड, पपईच्या दरात वाढ
मार्केट यार्डातील फळबाजारात कलिंगड, पपईच्या दरात वाढ झाली आहे. लिंबू, बोरे, सीताफळ, चिकू, अननस, मोसंबी, सफरचंद, किन्नू, खरबूज, डाळिंबाचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. फळबाजारात रविवारी जुन्या आणि नव्या बहरातील मोसंबी ४० ते ५० टन, संत्री १५ ते २० टन, डाळिंब ३० ते ३५ टन, लिंबे दीड हजार गोणी, कलिंगड ८ ते १० टेम्पो, खरबूज ३ ते ४ टेम्पो, चिकू एक हजार गोणी, पेरू ३०० ते ४०० प्लास्टिक जाळी (क्रेट), अननस ६ ट्रक, बाेरे दीड हजार गोणी, सफरचंद ८०० ते एक हजार खोकी, किन्नू ३ ते ४ हजार खोकी अशी आवक झाली.