लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : आवक कमी झाल्याने सर्व प्रकारच्या पालेभाज्यांचे दर कडाडले असून, किरकोळ बाजारात कोथिंबिरीच्या एका जुडीला ५० ते ६० रुपये दर मिळाले आहेत. मागणीच्या तुलनेत पाालेभाज्यांचे आवक कमी प्रमाणावर होत असून किमान महिनाभर पालेभाज्यांचे दर तेजीत राहणार असल्याची माहिती मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी दिली.
मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी नाशिक आणि लातूर भागातून ८० हजार जुडी कोथिंबिरेची आवक झाली. मेथीच्या ३० हजार जुडींची आवक झाली. कोथिंबीर, मेथी, कांदापातीसह सर्व प्रकारच्या पालेभाज्यांच्या दरात ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली. मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी कोथिंबीर एक लाख जुडी, मेथीच्या ५० हजार जुडी अशी आवक झाली. किरकोळ बाजारात कोथिंबिरेच्या एका जुडीचे दर ४० रुपये आहेत. मेथीच्या एका जुडीचे ३० ते ४० रुपयांपर्यंत आहेत. चांगल्या प्रतीच्या पालेभाज्यांना दर मिळाले आहेत.
आणखी वाचा-पुणे : बेपर्वाईचे तीन बळी; दुचाकींची समोरासमोर धडक
सध्या बाजारात आवक होत असलेल्या पालेभाज्यांची प्रतवारी चांगली नाही. पाण्याच्या तुटवड्यामुळे लागवडीवर परिणाम झाला असून, पालेभाज्या डागळलेल्या आहेत. पावसाळा सुरू झाल्यानंतर पालेभाज्या लागवडीस किमान महिनाभराचा कालावधी लागेल. त्यामुळे किमान महिनाभर पालेभाज्यांचे दर तेजीत राहणार आहेत, असे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील पालेभाजी व्यापारी राजेंद्र सूर्यवंशी यांनी सांगितले.
घाऊक बाजारात शेकडा पालेभाज्यांच्या दराक कोथिंबीर २००० ते ३५०० रुपये, मेथी १८०० ते २००० रुपये, शेपू ८०० ते १५०० रुपये, कांदापात ८०० ते २००० रुपये, चाकवत ४०० ते ८०० रुपये, करडई ३०० ते ७०० रुपये, पुदिना ४०० ते १००० रुपये, अंबाडी ४०० ते ७०० रुपये, मुळा ८०० ते १५०० रुपये, राजगिरा ४०० ते ७०० रुपये, चुका ८०० ते १२०० रुपये, चवळई ५०० ते ८०० रुपये, पालक १००० ते २००० रुपये असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.