पुणे : पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १८ वा आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांचा पाचवा हप्त्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज, शनिवारी (५ ऑक्टोबर) वितरण होणार आहे. वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी (ता. मानोरा) येथील कार्यक्रमात सुमारे ३९०० कोटी रुपये ९१.५२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत.
पीएम किसान योजना फेब्रुवारी २०१९ पासून सुरू आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास दोन हजार प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी सहा हजार रुपये बँक खात्यात जमा करण्यात येतात. योजने अंतर्गत सप्टेंबर २०२४ अखेर राज्यातील जवळपास १.२० कोटी शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यावर एकूण १७ हप्त्यांमध्ये सुमारे ३२००० कोटी रुपये जमा झाले आहेत.
हे ही वाचा…एकविरा गडावर किती आले, दर्शन घेतले आणि गेले; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला
पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्यात २०२३-२४ पासून नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आहे. पीएम किसान योजनेच्या १४ व्या हप्त्यापासून पुढील प्रत्येक हप्ता वितरणावेळी लाभ देण्यात आलेल्या राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळतो. राज्य सरकारने २०२३-२४ व २०२४-२५ या आर्थिक वर्षात चार हप्त्यांमध्ये एकूण ९१.४५ लाख शेतकरी कुटुंबाच्या खात्यावर ६९४९.६८ कोटी रुपये जमा केले आहेत.
हे ही वाचा…क्रिकेटपटू सलील अंकोला यांच्या आईचा संशयास्पद मृत्यू, प्रभात रस्ता परिसरातील घटना
शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार ३९०० कोटी
आज पीएमकिसान योजनेच्या १८ व्या हप्त्यापोटी एकूण ९१.५२ लाख शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात १९०० कोटीहून अधिक रक्कम तर राज्याच्या योजनेमधून २००० कोटी रुपयांहून अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.