सोलापूर / कराड / पुणे : भ्रष्टाचार आणि दहशतवादाच्या कलंकित इतिहासाची पार्श्वभूमी असलेल्या काँग्रेसच्या हाती सत्ता गेल्यास पुन्हा भ्रष्टाचार आणि दहशतवाद माजेल आणि देशाची फाळणी होईल, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केला. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सोलापूर, कराड आणि पुण्यात झालेल्या सभेत त्यांनी काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडीवर चौफेर टीका केली. ‘इंडिया’ आघाडीला सत्तेची मलई खायची असल्यामुळे पाच वर्षांत पाच पंतप्रधान करण्याचीही त्यांची तयारी असल्याचा दावाही पंतप्रधानांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचारार्थ पंतप्रधानांची सोलापुरातील होम मैदानावर सभा झाली. यावेळी त्यांनी दलित, भटके विमुक्त जाती-जमाती, ओबीसी घटकांच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाबू जगजीवनराम या दलित नेत्यांना काँग्रेसने सदैव अपमानित केले. दलित-आदिवासींचा नेहमीच आवाज दाबला आणि विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेस सरकारने ६० वर्षांत दलित, आदिवासी, ओबीसींचा जेवढा विकास केला, त्यापेक्षा कितीतरी जास्त पटींनी विकास दहा वर्षांत आपल्या सरकारने केल्याचा दावाही त्यांनी केला. भाजपने दलित व्यक्तीला राष्ट्रपतीपदाची संधी दिली. त्यानंतरही इतिहासात प्रथमच एका आदिवासी महिलेला राष्ट्रपती बनविले. आज देशात भाजपतर्फे सर्वाधिक आमदार, खासदार हे दलित, आदिवासी वर्गातील असल्याचा दावा मोदी यांनी केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उमेदवार राम सातपुते यांच्यासह माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे, अजित पवार गटाचे आनंद चंदनशिवे, शिंदे गटाच्या प्रवक्त्या प्रा. ज्योती वाघमारे या नेत्यांची भाषणे झाली. दुपारी भर उन्हात हजारोंचा जनसमुदाय सभेला उपस्थित होता.

हेही वाचा >>>सातारामध्ये उदयनराजेंच्या विजयाचा भगवा फडकेल; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास

सोलापूरनंतर सातारा लोकसभा मतदारसंघाचे ‘महायुती’चे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ कराडमध्ये पंतप्रधानांची सभा झाली. यावेळी ते म्हणाले, की मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला संविधान बदलू देणार नाही आणि काँग्रेस धर्माच्या नावावर आरक्षण आणण्याचा प्रयत्नही करू शकणार नाही. भाजप संविधान बदलणार या विरोधकांच्या आरोपाचेही त्यांनी खंडन केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नौदलावर अवघ्या विश्वाचा विश्वास असताना भारताच्या नौदलाच्या ध्वजावर मात्र ब्रिटिशांचे चिन्ह होते. या ध्वजावर आपण शिवमुद्रा आणल्याचे ते म्हणाले. सभेला केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थिती होते.

संध्याकाळी महायुतीच्या पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारानिमित्ताने मोदी यांची पुणे रेसकोर्सवर जाहीर सभा झाली. यावेळीही त्यांनी काँग्रेससह महाविकास आघाडीतील पक्षांवर व नेत्यांवर जोरदार टीका केली. पक्ष माओवाद्यांच्या ताब्यात गेल्याचे काँग्रेसमधून बाहेर पडलेले नेतेच सांगत आहेत. लोकांचे घर, लॉकर, स्त्रीधन, मंगळसूत्रावर काँग्रेसचा डोळा आहे. संपत्तीवर ५५ टक्के कर लावण्याचा त्यांचा इरादा असल्याचा आरोप मोदी यांनी केला. दहा वर्षांपूर्वीपर्यंत दहशतवादी हल्ले होत होते. ते रोखण्याऐवजी भगवा दहशतवादाच्या नावाखाली लोकांना ताब्यात घेण्यात आल्याची टीकाही पंतप्रधानांनी केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे, पुण्याचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार, शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, मावळचे उमेदवार श्रीरंग बारणे आदी उपस्थित होते.

हेही वाचा >>>पिण्याच्या पाण्यासाठी गेला बालिकेचा मंगळवेढ्यात बळी

‘भटकत्या आत्म्याच्या महत्त्वाकांक्षेमुळे महाराष्ट्र अस्थिर’

महाराष्ट्र राज्य एका भटकत्या आत्म्याचा शिकार झाले आहे, अशी टीका पंतप्रधानांनी पुण्यातील जाहीर सभेत केली. या खेळाला एका नेत्याने ४५ वर्षांपूर्वी सुरुवात केली. ज्या लोकांची स्वप्ने पूर्ण होत नाहीत, अशी माणसे दुसऱ्याची स्वप्ने पूर्ण होऊ देत नाहीत. असे भटकते आत्मे दुसऱ्याची स्वप्ने बिघडवितात. त्यांच्या महत्त्वाकांक्षेमुळे महाराष्ट्र अस्थिर झाला. काही मुख्यमंत्र्यांना कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. विरोधकांबरोबरच देश, राज्य, पक्ष आणि कुटुंबही या आत्म्याने अस्थिर केले. भाजपचे सरकार पाडण्याचा प्रयत्नही या आत्म्याने केला. या परिस्थितीत देशाला स्थिर सरकार हवे आहे. या अतृप्त, भटकत्या आत्म्यांपासून देशाला वाचविण्याची आवश्यकता आहे. भाजप-रालोआ सरकार महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर घेऊन जाईल, असे मोदी म्हणाले.

कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने एका रात्रीत मुस्लिमांना इतर मागास वर्गाचे आरक्षण लागू करून २७ टक्के आरक्षणावर डाका टाकला. मुस्लिमांचे लांगुलचालन केले. आता हीच पद्धत देशभर राबवून इतर मागास वर्गावर अन्याय करण्याचे काँग्रेसचे धोरण आहे.– नरेंद्र मोदी, पंतप्रधान