पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. या कार्यक्रमात शरद पवार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींना हा पुरस्कार देण्यात आल्याबद्दल शरद पवार यांनी आनंदही व्यक्त केला. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लोकमान्य टिळक यांची महती सांगणारं एक भाषण केलं. या भाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा लोकमान्य टिळक स्मारक समितीचे सदस्य, मंचावर उपस्थित असलेले शरद पवार आणि सुशील कुमार शिंदे यांच्यासह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. अजित पवार आणि पंतप्रधान मोदी जेव्हा समोरा समोर आले तेव्हा घडलेला प्रसंग चर्चेत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अजित पवार समोर आले तेव्हा काय घडलं?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार आणि सुशील कुमार शिंदे यांच्याशी हस्तांदोलन केलं. त्यानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही भेटले. त्यांच्याशीही त्यांनी हात मिळवला. पुढे गेल्यानंतर जेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी समोरासमोर आले तेव्हा त्यांनी अजित पवारांशी हात तर मिळवलाच शिवाय त्यांच्या हातावर हलकेच थोपटलं. त्यानंतर अजित पवार यांनी सूचक हास्यही केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यानंतर वळले आणि पुढच्या कार्यक्रमाला निघून गेले.