लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेत (नीट-यूजी) समान गुण असलेल्या विद्यार्थ्यांची क्रमवारी ठरवण्याच्या नियमावलीत राष्ट्रीय वैद्यक आयोगाने (नॅशनल मेडिकल कमिशन) नुकताच बदल केला आहे. आता समान गुण असलेल्या विद्यार्थ्यांची क्रमवारी ठरवण्यासाठी जीवशास्त्राऐवजी भौतिकशास्त्राला प्राधान्य दिले जाणार आहे.

राष्ट्रीय वैद्यक आयोगाच्या पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षण मंडळाने (अंडर ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन बोर्ड) ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन रेग्युलेशन्स २०२३ राजपत्राद्वारे प्रसिद्ध केले आहेत. सध्याच्या पद्धतीनुसार जीवशास्त्राला प्राधान्य देऊन त्यानंतर रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र या विषयांचे गुण विचारात घेतले जात होते. मात्र आता त्यात बदल करण्यात आला आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार नीट-यूजीमध्ये समान गुण असलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत क्रमवारी ठरवण्यासाठी भौतिकशास्त्राच्या गुणांना प्राधान्य देऊन त्यानंतर रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र विषयांचे गुण विचारात घ्यावेत. त्यानंतरही गुण समान राहिल्यास मानवी हस्तक्षेप राहणार नाही या दृष्टीने संगणकीय पद्धतीने सोडत काढून गुणवत्ता यादीसाठी विद्यार्थ्यांची निवड करावी. असे नमूद करण्यात आले आहे.

आणखी वाचा-पुण्यातील प्रसिद्ध वैशाली हॉटेल वादात, बंदुकीच्या धाकाने केला ‘हा’ प्रकार

एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षासाठी चारपेक्षा जास्त संधी दिल्या जाणार नाहीत. तसेच कोणत्याही विद्यार्थ्याला प्रवेशानंतर नऊ वर्षांनी पदवीपूर्व अभ्यासक्रम सुरू ठेवता येणार नाही. श्रेयांक निवड अभ्यासक्रमाअंतर्गत राष्ट्रीय वैद्यक आयोगाच्या आणि विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त वैद्यकीय संस्थेत विविध अभ्यासक्रम ठरावीक कालावधीसाठी उपलब्ध असतील. मात्र या विषयांमुळे मुख्य पदवीपूर्ण शिक्षणावर परिणाम होता कामा नये, असेही नमूद करण्यात आले आहे. या नियमावलीची अंमलबजावणी पुढील वर्षीपासून होण्याची शक्यता आहे.