लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : शहरातील वाहतुकीची गती वाढविण्यासाठी पुढील टप्प्यात रस्त्यांची वहनक्षमता (कॅरिंग कपॅसिटी) वाढविण्याला प्राधान्य देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तसेच, रस्त्यांचा पूर्णत: वापर वाहतुकीसाठीच व्हावा, या दृष्टीनेही नियोजनाला सुरुवात झाली आहे.

शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आणि वाहतूक पोलिसांकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे काही भागातील वाहतुकीची गतीही वाढली आहे. त्यानंतर पुढच्या टप्प्यातील उपाययोजना नियोजित आहेत. त्याबाबतची माहिती महापालिका आयुक्त, प्रशासक डॉ. राजेंद्र भोसले, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील आणि महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी शुक्रवारी दिली.

रस्त्यांची दुरुस्ती झाल्याने वाहतुकीचा वेग वाढला आहे. यापूर्वी पर्यायी रस्त्यांचा, गल्लीबोळांचा वापर होत होता. मात्र, आता वाहनचालकांकडून मुख्य रस्त्यांवरून प्रवास करण्यास प्राधान्य दिले जात आहे. ही बाब ‘एटीएमएस’ यंत्रणेच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. खासगी ट्रॅव्हल कंपन्यांना शहरातील मार्ग आणि पार्किंग उपलब्ध करून दिल्याने बस रस्त्यांवर थांबून होणारी कोंडीही कमी झाली आहे.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पीएमपीचे बसथांबे स्थलांतरित करण्यात येत असून, आतापर्यंत ११ बसथांबे स्थलांतरित करण्यात आले आहेत. त्यामुळे पुढील टप्प्यात रस्त्यांच्या कडेला असलेली पार्किंगची जागाही कमी केली जाणार असून, प्रमुख रस्त्यांवर रिक्षा आणि थांब्यांनाही बंदी घालण्यात येणार आहे. बसथांब्यासमोवर उभ्या राहणाऱ्या रिक्षांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे, असे डॉ. भोसले यांनी सांगितले.

या रस्त्यांवरील अतिक्रमणे असल्यास ती काढून टाकण्यात येतील. त्यांतर रस्ते वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेने उपलब्ध झाल्यानंतर वाहतूक कोंडी कमी होऊन गती वाढले. त्यामुळे रस्त्यांची वहन क्षमता वाढविण्यात येईल. त्यादृष्टीने महापालिका आणि वाहतूक पोलिसांकडून नियोजन सुरू करण्यात आले असल्याचे मनोज पाटील यांनी सांगितले.