अनायसे मी पुण्याला जाणारच होतो. या मंडळींना मुंबईला बोलावून घेण्यापेक्षा साहित्य संमेलनाचा धनादेश मी पुण्यामध्येच नेऊन दिला असता.. अशा शब्दांत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाषा विभागाच्या अधिकाऱ्यांना गुरुवारी कानपिचक्या दिल्या.
सासवड येथे होणाऱ्या ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य सरकारतर्फे देण्यात येणारा २५ लाख रुपये अनुदानाचा धनादेश गुरुवारी प्रदान करण्यात आला. वर्षां या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य आणि कोशाध्यक्ष सुनील महाजन यांनी हा धनादेश स्वीकारला. या प्रसंगी संमेलनाचे स्वागताध्यक्ष विजय कोलते आणि निमंत्रक रावसाहेब पवार उपस्थित होते. केवळ अध्र्या तासाच्या या अनौपचारिक कार्यक्रमासाठी या सर्वानी पहाटेच पुण्याहून मुंबईकडे कूच केली. या भेटीनंतर मुख्यमंत्री पुण्यातील कार्यक्रमांना जाण्यासाठी निघून गेले.
विविध कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री गुरुवारी पुण्याला येणार होते. त्यामुळे पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुपारी पुण्यातील शासकीय विश्रामधाम येथे हा धनादेश प्रदान करण्यात येणार होता. मात्र, ‘मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धनादेश स्वीकारण्यासाठी आपल्याला उद्या सकाळी साडेदहा वाजता वर्षां बंगल्यावर उपस्थित राहायचे आहे,’ असा निरोप देणारा दूरध्वनी बुधवारी (२५ डिसेंबर) रात्री आल्याचे साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्याने सांगितले. पुण्याहून आल्याचे समजताच ‘त्यांना येथे बोलावण्यापेक्षा मीच हा धनादेश पुण्याला नेऊन दिला असता,’ अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी या हेलपाटय़ाविषयी नापसंती व्यक्त केली.