पिंपरी पालिकेचे माजी आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या बदलीचा संदर्भ देत राष्ट्रवादीच्या दबावाविषयी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेले विधान धादांत खोटे आहे, असे प्रत्युत्तर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. राष्ट्रवादीच्या दबावाला बळी पडून बदली केल्याचे सांगणाऱ्या चव्हाणांनीच राज्य सहकारी बँकेवर कारवाई कशी केली होती, याकडे अजितदादांनी लक्ष वेधले.
पिंपरी पालिकेच्या आयुक्तपदावरून डॉ. श्रीकर परदेशी यांची बदली राष्ट्रवादीच्या प्रचंड दबावामुळेच केली होती, असे विधान पृथ्वीराज चव्हाणांनी केले होते. पिंपरीतील अनधिकृत बांधकामांच्या विरोधात डॉ. परदेशी यांनी कारवाई सुरू केली होती. ती कारवाई सुरू राहिल्यास आपल्या हक्काच्या मतांवर परिणाम होईल, असे सांगत परदेशींच्या बदलीसाठी आपल्यावर राष्ट्रवादीचा प्रचंड दबाव होता, त्यामुळेच आपल्याला नाईलाजाने त्यांची बदली करावी लागली, असे चव्हाण यांनी म्हटले आहे. शासनाला उत्पन्न मिळवून देणाऱ्या विभागांसाठी अशा चांगल्या अधिकाऱ्यांची गरज असल्याचे सांगत मुद्रांक व नोंदणी शुल्क विभागात परदेशी यांची बदली झाल्याचा युक्तिवाद अजितदादांनी वेळोवेळी केला होता. चव्हाणांच्या या विधानासंदर्भात, शनिवारी पत्रकारांनी अजितदादांकडे विचारणा केली असता ते म्हणाले, मुद्रांक व नोंदणी शुल्क विभागाकडून शासनाला मोठय़ा प्रमाणात उत्पन्न मिळते, त्या ठिकाणी चांगला अधिकारी हवा म्हणूनच परदेशींना तेथे पाठवण्यात आले होते. चव्हाण खोटे बोलत आहेत. मुख्यमंत्री असताना पृथ्वीराज चव्हाण कोणाचेही ऐकत नव्हते. जे योग्य आहे, तेच मी करतो, असे ते स्वत:बद्दल सांगत होते. मग, परदेशींच्या बदलीबाबत त्यांनी दबाव कसा मान्य केला. राष्ट्रवादीचा दबाव होता तर त्यांनी राज्य सहकारी बँकेवर कारवाई कशी केली होती, असा मुद्दाही अजितदादांनी उपस्थित केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा