माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : गेल्या काही निवडणुकीतील निकाल पाहता येत्या लोकसभा निवडणुकीत धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होऊ नये, यासाठी काँग्रेसकडून समविचारी पक्षांना बरोबर घेतले जात आहे. त्यानुसार वंचित बहुजन आघाडीला बरोबर घेण्यासाठी पक्षाने प्रकाश आंबडेकर यांना यापूर्वीच प्रस्ताव  दिला आहे. परंतु, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानिक चौकटीत आणण्याची प्रकाश आंबेडकर यांची मागणी म्हणजे आघाडीत येण्यासाठी कुरापत काढण्याचा प्रकार आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी केला.

शहर काँग्रेसकडून आयोजित पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. ते म्हणाले, सरदार वल्लभभाई पटेल यांच्यापासून काँग्रेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेशी लढत आहे. संघावर काँग्रेसने बंदीदेखील घातली होती. असे असताना आघाडीत येताना केवळ कुरापत काढण्यासाठी आंबेडकर यांच्याकडून अटी टाकण्यात येत आहेत. आघाडीत सामील होण्यासाठी काँग्रेसने यापूर्वीच आंबेडकर यांच्याकडे प्रस्ताव दिला आहे. तो स्वीकारायचा की, नाही? या त्यांचा प्रश्न आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी सांगलीच्या जागेबाबतचा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात आला आहे. तर, नगरची जागा काँग्रेसकडे ठेवायची, की मित्रपक्षाला द्यायची याबाबत पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी इतर वरिष्ठ नेत्यांबरोबर चर्चा करत आहेत. या दोन्ही जागा आणि तेथील उमेदवारांबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असेही चव्हाण यांनी सांगितले.

पुण्याच्या जागेचा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे

लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातून पक्षाचा संभाव्य उमेदवार कोण असेल, याबाबत मी आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पक्षाच्या वरिष्ठ आणि स्थानिक नेत्यांबरोबर चर्चा केली आहे. इच्छुकांसह सर्वाचे म्हणणे ऐकून अहवाल पक्षश्रेष्ठींकडे पाठवला आहे. त्यावर लवकरच निर्णय होईल, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.