महायुती सरकारकडून राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेला राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यभरात जवळपास १ कोटी ५ लाख महिलांनी अर्ज दाखल केले आहेत. तर रक्षाबंधनाच्या दिवशी लाभार्थी महिलांना दोन महिन्यांचा हप्ता मिळणार आहे. या योजनेवरून विरोधी पक्षातील नेत्यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. या योजनेवरून काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना पुढील काळात देखील सुरू ठेवायची असेल तर महायुतीच्या उमेदवारांसमोरील बटन दाबण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका सभेदरम्यान केले आहे. त्या विधानाबाबत काँग्रेस पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना विचारले असता, अजित पवार यांना त्याच्याशिवाय काही दिसत नाही. दहा वर्षांत लाडकी बहीण आठवली नाही. लोकसभेच्या निकालानंतर लाडकी बहीण आठवली ही चांगली गोष्ट आहे, असा टोला त्यांनी लगावला.
हेही वाचा – VIDEO : पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा एकदा हिट अॅण्ड रन प्रकरण! घटना सीसीटीव्हीत कैद
आम्ही कर्नाटक राज्यात ही योजना यशस्वीपणे राबविली आहे. २ हजार रुपये देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आम्ही देत आहोत, तेलंगणामध्येदेखील ही योजना राबविली आहे. त्यामुळे या योजनेसाठी किती पैसे द्यायचे हे आम्ही आमच्या जाहीरनाम्यात ठरवू, अशी भूमिकाही पृथ्वीराज चव्हणा यांनी मांडली.