लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या शनिवारच्या पुणे दौऱ्याबाबत प्रशासनाकडून गोपनियता ठेवण्यात आली होती. शुक्रवारी दिवसभर शासकीय विश्रामगृहात बैठका घेतल्यानंतर शनिवारी देखील शासकीय विश्रामगृहात पवार यांनी बैठका घेतल्या. मात्र, याबाबत गोपनियता ठेवण्यात आली होती. बैठकीला केवळ वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. तसेच बैठकीच्या सुरुवातील पवार हे केवळ कागदपत्रे पाहण्यात व्यस्त होते, त्यानंतर बऱ्याच वेळाने पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांची काही कामे, हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचा विषय हाताळून तातडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी मुंबईला रवाना झाले.
गेल्या आठवड्यात पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर पवार हे शुक्रवारी प्रथमच पुणे दौऱ्यावर आले होते. शुक्रवारी दिवसभर त्यांनी शासकीय विश्रामगृहात विविध विकासकामांचा आढावा घेतला. शनिवारी ते बारामतीला जाणार होते. मात्र, अचानक पवार यांनी शनिवारी देखील काही बैठका घेण्याची सूचना केली. या बैठकांना लोकप्रतिनिधी, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते येऊ नयेत, याकरिता हा दौरा गोपनिय ठेवण्याचे आदेश दिले होते.
आणखी वाचा-Dussehra 2023: एकविरा देवी नवरात्रोत्सव यात्रेनिमित्त जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतुकीत बदल
या बैठकांना केवळ विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीएचे आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता उपस्थित होते. बैठकीला सुरुवात झाल्यानंतर काही काळ पवार हे केवळ कागदपत्रांची तपासणी करत होते. अधिकाऱ्यांशी त्यांनी बराच काळ संवाद साधला नाही, त्यामुळे अधिकारी देखील बुचकाळ्यात पडले होते. त्यानंतर बैठका आटोपून शासकीय विश्रामगृहातून पवार हे तातडीने पंतप्रधान मोदी यांच्या स्वागताला मुंबईकडे रवाना झाले. त्यानंतर रात्री उशीरा मुंबईतून थेट ते बारामतीला रवाना झाले.