लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) जाहीर केलेल्या वेळापत्रकाऐवजी शहरातील अनेक खासगी विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांनी आपल्या आधी ठरविलेल्या वेळापत्रकानुसारच परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. काही खासगी शाळा याला अपवाद असून, त्यांच्यासह अनुदानित शाळांनी ‘एससीईआरटी’च्या सूचनांनुसार वेळापत्रकात बदल केले आहेत.
‘एससीईआरटी’ने नुकतेच शालेय वेळापत्रक जाहीर करून, राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये पहिली ते नववीच्या परीक्षा ८ ते २५ एप्रिल या कालावधीत घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यात नववीची परीक्षा ८ एप्रिल ते १९ एप्रिल, आठवीची परीक्षा ८ एप्रिल ते २५ एप्रिल, सहावी आणि सातवीची परीक्षा १९ ते २५ एप्रिल, पाचवीची परीक्षा ९ ते २५ एप्रिल, तिसरी आणि चौथीची परीक्षा २२ ते २५ एप्रिल, तर पहिली आणि दुसरीची परीक्षा २३ ते २५ एप्रिल या कालावधीत घेणे अपेक्षित आहे. तसेच, खासगी अनुदानित व शासकीय शाळांना नियतकालिक मूल्यमापन चाचणीच्या (पॅट) प्रश्नपत्रिका ‘एससीईआरटी’कडून दिल्या जाणार आहेत. मात्र, काही खासगी विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शाळांनी ‘एससीईआरटी’ने ठरवून दिलेल्या वेळापत्रकाऐवजी, त्यांनी पूर्वी तयार केलेल्या वेळापत्रकानुसारच परीक्षा घ्यायचे ठरवले आहे.
याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या उपाध्यक्ष जागृती धर्माधिकारी म्हणाल्या, ‘शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच वर्षभराचे वेळापत्रक तयार केले जाते. अनेक पालक बाहेरगावी जाणार असतात, त्यांचे सहलींसाठी आगाऊ आरक्षण झालेले असते. त्यामुळे आयत्या वेळी परीक्षेचे वेळापत्रक बदलणे शक्य नाही. खासगी संस्था स्वायत्त असल्याने त्यांनी स्वत:चे वेळापत्रक ठरवले आहे. त्यानुसारच परीक्षा होतील. साधारणपणे १० ते १५ एप्रिलपर्यंत परीक्षा संपतील. ‘एससीईआरटी’ने परीक्षांचे वेळापत्रक शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला जाहीर करणे आवश्यक आहे. निर्णय घेताना सर्व घटकांना सहभागी करून घेतले पाहिजे, जेणेकरून कोणताही गोंधळ होणार नाही.’
‘डेक्कन एज्युकेशन सोसायटीकडून शाळांचे वेळापत्रक निश्चित करण्यात येते. त्यानुसार आधीच्या वेळापत्रकात बदल करून आता ७ ते १९ एप्रिल या कालावधीत परीक्षा घेतल्या जाणार आहेत. आम्ही शासनाच्या निर्देशांचे पालन करण्याचा निर्णय घेतला आहे,’ असे न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रीतम जोशी यांनी सांगितले.
‘नियतकालिक मूल्यमापन चाचणी शासनाकडून घेतली जात असल्याने त्याच्या वेळापत्रकात बदल करता येत नाही. त्यामुळे शाळास्तरावरील वेळापत्रक ‘एससीईआरटी’च्या वेळापत्रकाशी जोडून घेण्यात आले आहे,’ असे नूतन मराठी विद्यालय या अनुदानित शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश कांबळे यांनी नमूद केले.
राज्य मंडळाशी संलग्न सर्व शाळांनी परीक्षांच्या वेळापत्रकाचे पालन करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठी अध्ययन-अध्यापनाचा वेळ वापरणे आवश्यक आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून वेळापत्रक पुरेसे आधी जाहीर केले जाईल, असे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.